Sunday, August 16, 2009
शाहरूखच्या निमित्ताने
याच घटनेच्या काही दिवस आधी इम्रान हाश्मी याला तो मुसलमान असल्याने घर नाकारण्यात आलं होतं आणि समाजात पुन्हा एकदा मुस्लिमांच्या स्थितीबद्दल उलट-सुलट चर्चा झाली. मग त्यानेच या परिस्थितीपासून घुमजाव करत आपल्याला चुकीची माहिती मिळाल्याचे सांगितले. त्याआधी शबाना आझमीनेही असाच आरोप केला होता की मुस्लिमांना या देशामध्ये घर मिळणंही मुश्कील झालं आहे.
महाराष्ट्र सरकारने गेल्या महिन्यात एक विचित्र निर्णय घेतला. ज्या मुस्लीम मुलांनी हिंदू मुलींशी विवाह केला आहे त्यांची सीआयडीमार्फत चौकशी करणार. कारण काय त्यांना जबरदस्तीने हा विवाह करायला भाग पाडण्यात आलं आहे, असं एका मंत्र्याचं स्वतःचंच अनुमान.
पहिल्या तीन घटना या प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्तींबरोबर घडल्या आणि त्यांना लगेच प्रसिद्धी मिळाली. पण असे अनेक मुस्लिम आहेत की ते केवळ सर्वसामान्य असल्याने त्यांच्याबरोबर घडलेल्या अशा घटना प्रकाशझोतात येत नाहीत.
काही महिन्यांपूर्वी कामानिमित्त मालेगावला गेले होते. तिथे काही बायका भेटल्या. एक वर्षाहून अधिक काळ त्यांचे नवरे हे जेलमध्ये होते, मुंबईत झालेल्या विविध बॉम्बस्फोटांच्या आरोपावरून. आता खरे आरोपी सापडूनही त्यांना सोडण्यासाठी सरकारचे काही विशेष प्रयत्न नाहीत. पुन्हा आपले नवरे परत येतील याची शाश्वती त्यांना नाही.
अलीकडेच लष्करची अतिरेकी म्हणून मारण्यात आलेल्या खालसा कॉलेजमधल्या इशरत जहॉं या विद्यार्थीनीची केस सुप्रीम कोर्टाने पुन्हा तपासणीसाठी उघडली.
दुबईत नोकरीसाठी गेलेल्या आणि भारतात काही दिवसांसाठी परत आलेल्या ख्वाजा युनूसलाही मुंबई पोलिसांनी बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली पकडलं आणि तो कोठडीतून फरार झाल्याचं सांगितलं. पण तो आजपर्यंत सापडलेला नाही.
संसदेवर झालेल्या हल्ल्यामध्ये पकडण्यात आलेल्या आरोपींना कोर्टाने निर्दोष म्हणून सोडून दिले त्यावेळी पोलिसांनी त्यांना आरोपी म्हणून अडकवण्यासाठी कायदे कसे वळवले होते हे तर जगाच्याच समोर आलं.
भारतात अशा घटना अनेक वर्ष घडत आहेत. त्यांचं समर्थन होऊच शकत नाही. पण केवळ सेलिब्रिटी असल्याने त्यांना वेगळा न्याय आणि गोरगरिबांना मात्र त्यांचा लढाही लढता येऊ नये असं का होतं ?
इम्रान हाश्मीला घर मिळालं नाही म्हणून बॉलिवूडचे अनेक दिग्गज धावून आले, शाहरूखच्या चौकशीविरोधात सरकारने टिट फॉर टॅट म्हणून पत्रक काढलं. पण हीच प्रतिक्रिया सामान्य मुस्लिमांबद्दल मात्र नसते.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा शाहरूखच्या प्रकरणाच्या निमित्ताने पुढे आला. अमेरिकन यंत्रणांबद्दल वृथा अभिमान बाळगणारे काही भारतीय आहेत. ९य११ नंतर अमेरिकेवर हल्ला झाला नाही कारण त्यांनी यंत्रणा तशी सज्ज केली. पण भारतावर मात्र आजही दहशतवादी हल्ले होत आहेत, असं त्यांचं आर्ग्युमेंट असतं. (म्हणून अमेरिका ग्रेट ! ) पण स्वतःचा आत्मघात करायचा ठरवलेला माणूस कितीही सुरक्षा असली तरी ती भेदू शकतो याकडे मात्र दुर्लक्ष होतं. पुन्हा तिथे प्रत्येक मुसलमानावर जर संशयाची सुई असेल तर त्यांना जगणं केवळ अशक्य आहे.
पण हे थांबणार कसं हा प्रश्न मला कायम भेडसावतो.
Wednesday, July 1, 2009
लोकशाहीचे जवान
लोकसभा निवडणुकीमध्ये जम्मू आणि काश्मीरमधल्या संस्कार प्रांतातल्या केवळ ४७ मतांसाठी निवडणूक अधिका-यांनी कल्पनेपलीकडची कसतर केली. त्यामुळेच त्या ४७ जणांना त्यांचा मतदानाचा मूलभूत हक्क बजावता आला.
लडाखच्या संस्कार प्रांतामध्ये फेमा आणि रोलेटुंग या दोन मतदारसंघांमध्ये अनुक्रमे १४ आणि २३ मतदार होते. सुमारे १६ हजार फूट उंचीवर असलेल्या या गावांमध्ये हॅलिकॉप्टर पोहोचणं केवळ अशक्य होतं. मग शेवटी दोन शेर्पांना सोबत घेऊन मतदान अधिकारी मतपेट्या पाठीवर लादून चक्क ट्रेक करत निघाले. खूप मोठ्या प्रमाणात बर्फाळ असलेल्या या प्रदेशातून रात्रीच्यावेळी वाटचाल करणं त्यांनी पसंत केलं कारण सकाळी बर्फ वितण्याची भीती होती.
आठ तास चालल्यावर गुहेमध्ये मुक्काम केला. त्यांच्याजवळ आधाराला फक्त मेणबत्त्याच होत्या. अशा सगळ्या बिकट परिस्थितीवर मात करत त्यांची वाटचाल सुरू राहिली. दोन दिवसांनी अखेर अधिकारी या दोन्ही गावांमध्ये पोहोचले. मग प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ४६ जणांनी मतदान केलं आणि एकाने मतदान न करणं पसंत केलं.
पुन्हा खाली उतरून मतमोजणी करणं केवळ अशक्य होतं. शिवाय काश्मिरमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान झालं होतं आणि १६ मे रोजी निकाल जाहीर करण्याचं आधीच ठरलं होतं. मग इथल्या अधिका-यांना विशेष परवानगी देण्यात येऊन तिथेच मतमोजणी झाली आणि तो संदेश दिल्लीच्या मुख्य निवडणूक कार्यालयात पोहोचला तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. या दोन गावांतील मतदानाचे निकाल हाती आल्याने ख-या अर्थाने देशाच्या प्रत्येक कोप-यातील नागरिकाला मतदानाचा अधिकार बजावता आला होता.
हा निकाल हाती पडताच संपूर्ण देशाचा निकाल हाती घेऊन वचन दिल्याप्रमाणे चावला अर्धातासच उशिरा राष्ट्रपतींना भेटले. राष्ट्रपती भवनाच्या पाय-या चढताना त्यांच्या मनात अशा अधिका-यांबद्दल खूप अभिमान दाटून आला होता.
Sunday, June 21, 2009
भविष्य नसलेली माणसं
आपण कशासाठी जगतो तर भविष्यात नक्कीच काहीतरी चांगलं वाढून ठेवलंय या आशेवर. भविष्याचा विचार करणं हा आपला स्थायीभाव आहे. एखादा मोठा निर्णय घेताना किंवा अगदी रोजची भाजी घेतानाही ती उद्यासाठी होईल असा विचार मनात येतोच. पण काही लोकांना भविष्यंच नसतं. फक्त भूतकाळ त्यांचा पिच्छा पुरवत राहतो. त्याच्या जोरावर जगायचं का मरायचं हेसुद्धा त्यांना समजत नाही.
कालच बहामन घोबाडीचा 'टर्टल्स कॅन फ्लाय' चित्रपट पाहिला आणि हेच विचार सतत मनात येत राहिले. इराक आणि तुर्कस्तानच्या सीमेवर हा चित्रपट घडतो. त्याला अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्याची पार्श्वभूमी आहे.
युद्धग्रस्त भागात राहणा-या मुलांच्या आयुष्याचं चित्रण यात आहे. त्यांना सुरुंग काढण्यासारखी करावी लागणारी धोकादायक कामं, त्यांचा मानसिक छळ, बलात्कार आणि त्यातून तयार होणारं त्यांचं भावविश्व याचा प्रत्यय चित्रपटात येतो. चित्रपट थोडासा प्रो-अमेरिकन असला तरी कथा खूप चांगली आहे.
भविष्य नसलेल्या मुलांच्या वास्तव आयुष्यातली दाहकता यानिमित्ताने पुढे येते. चित्रपट बाजूला ठेवून जगाचा विचार केला तर जगातील मध्य पूर्वेच्या अनेक देशांमध्ये युद्ध सुरू आहेत. अफगाणिस्तानसारखे अनेक देश बेचिराख झाले आहेत. पाकिस्तानसारखे देश विनाशाच्या दिशेने चालले आहेत. तिथल्या मुलांचं काय आयुष्य असेल कल्पनाच भयानक वाटते.
युद्धाचाच विषय निघाला आहे तर आठवलं की कालच संध्याकाळी सॅम्युअल बेकेटचं 'वेटींग फॉर गोदो' पाहिलं. सुरुवातीची १५ मिनिटं काय चाललंय हेच कळेना. जेव्हा नाटक समजायला सुरुवात झाली तेव्हा ते संपत आलं होतं. खूप विचार केला, मित्राशी चर्चा केली, त्याबद्दल इंटरनेटवर वाचलं आणि मग त्याची थीम थोडी लक्षात आली. आता जितकेवेळा त्याचा विचार मनात येतो तेवढे वेळा नवीनच अर्थ त्यातून उलगडल्यासारखा वाटतो.
दुस-या महायुद्धामध्ये नरसंहार मोठ्या प्रमाणात झाला. त्यात अनेकांचे जवळचे म्हणावेत असे लोक ठार झाले. भणंग लोकांची संख्या वाढली आणि त्यांना जगण्याची काहीच आशा उरली नाही. पण मरणार कसं. मनात विचार आला तरी मरण एवढं सोपं नाही. मग ते काय करतील? ते काय बोलतील? कसं जगतील? त्यांच्यासाठी काय आशावाद असेल? काय आयुष्य असेल? ते विचार काय आणि कसा करतील? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं गोदोमध्ये आहेत. पण ते पुन्हा बघायचंय किंवा वाचायचंय त्याशिवाय माझ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं सापडणार नाहीत.
अफलातून फिलॉसॉफी
आज तो सवयीप्रमाणे गप्पा मारायला आला, विषय होता देव. (त्याच्या आणि माझ्या संवादात फक्त तो बोलत असतो आणि मी एखादा दुसरा शब्दच बोलते.)
तोः हे साले लोक मूर्ख आहेत. त्या सिद्धीविनायकाभोवती भींत बांधलीये देवाचं रक्षण करायला. तरीही लोक त्याच्या पाया पडायला जातात की बाबारे माझं रक्षण कर. कोण कोणाचं रक्षण करणार तेच कळत नाही.
मीः खरं आहे.
तोः आता त्या लालबागच्या राजाला नवसासाठी पहाटेपासून रांगा लागतात. पण तुमच्या घरातला गणपती आणि लालबागचा गणपती वेगळा आहे का? हेच लोकांना कळत नाही.
मीः होय.
मुंबईच्या नावानं चांगभलं!
पाच बिझनेसमन एका रात्री अस्वस्थ होतात आणि मोबाईलवरून मेसेज पाठवून एकमेकांना भेटण्याची तारीख आणि वेळ निश्चित करतात. ते भेटतात तेव्हा त्यांच्यात एकच विषय असतो या शहराची वाट लागली आहे. घरासमोरच्या रस्त्यावर हॉकर्स बसतात, मॉलमध्ये फाल्तूच्या लोकांची संख्या वाढत आहे, पाणी एक तास कमीच येतं, हॉटेल मरिन ड्राइव्हमध्ये डिनरसाठी आजकाल वेटींग असतं.
एवढे गहन प्रश्न निर्माण झाल्याने काय करायचं. सगळ्यात आधी तर याला राजकारणी जबाबदार आहेत. मग वाढत्या झोपड्यांमुळे असं होतंय अशी मोठ्ठी कारणमीमांसा होते. त्यानंतर त्यांच्यातला 'चे गव्हेरा' जागा होतो आणि ठरतं की या अशा नालायक सरकारच्या विरोधात एकत्र यायचं आणि एनजीओ काढायची.
------------------------------------------------------------------------------------------------
एका प्रसिद्ध बापाचा अर्थातच एक प्रसिद्ध मुलगा असतो. तो एके दिवशी गाडीतून निघतो दुस-या ठिकाणी जायला आणि मोठ्याच संकटात सापडतो. गाडीचा रस्ता २०-२५ मिनिटांचाच असतो पण त्याला ट्रॅफिकमुळे तब्बल ४० मिनिटं लागतात. त्याला हे सहनच होत नाही.
मग त्याला या शहरासाठी काहीतरी करायची ऊर्मी येते आणि तो आपल्या मित्रमैत्रिणींना जमवतो. या शहराची कशी वाट लागली आहे आणि ते आपल्यालाच सुधारायचंय अशी वैचारिक चर्चा त्यांच्यामध्ये होते. मग ब्रेनस्टॉर्मिंग चर्चेचं फलित निघतं की एक एनजीओ काढला पाहिजे तरच या शहराचं भलं होईल शेवटी आपण इथेच राहत असल्याने आपलीही काही जबाबदारी आहे की नाही.
मग एनजीओचं उद्घाटन होतं आणि पुढच्या कार्यक्रमाची रुपरेषा पत्रकारांना सांगितली जाते. सगळ्यात पहिला कार्यक्रम मुंबई वनीकरणाचा. झाडं लावा झाडं जगवा. लवकरच या कार्यक्रमाची तारीख घोषित करण्यात येईल आणि आपणही त्यात सहभागी होऊ शकता.
(विशेष सूचनाः वर दिलेल्या दोन्ही घटना काल्पनिक नसून त्यांचा वास्तवाशी पूर्ण संबंध आहे. त्यातील पात्र, प्रसंग आपल्याला प्रत्यक्षात पाहिला मिळाल्यास तो केवळ योगायोग समजू नये ही विनंती.)
Thursday, June 18, 2009
बायकाही बलात्कार करू शकतात!
त्याने घरात कामाला येणा-या बाईवर बलात्कार केला हे अनेकांना सुरुवातीला खरंच वाटतं नव्हतं. पण आता मेडिकल रिपोर्टनी ते सिद्घ केलंय. या सगळ्यामध्ये त्याची बायको अनुपम त्याच्या मदतीला धावून आली यात गैर काहीच नाही. पण तिने त्या कामवाल्या बाईच्या विरोधात केलेलं विधान म्हणजे नव-याला वाचवण्याचा केलेला अत्यंत केविलवाणा प्रयत्न म्हणता येईल. ती म्हणाली 'बायकाही बलात्कार करू शकतात!'
इथे तिचं म्हणणं खरंही मानलं तरी ती बाई स्वतः बलात्कार करणार आणि त्याची तक्रार स्वतःच पोलिसांना करणार की तिच्यावर बलात्कार झाला आहे म्हणून.
आपल्या एखाद्या माणसाने अपराध केला म्हणून स्वतःची सद्सदविवेकबुद्धी बाजूला ठेवून त्याला वाचवू पाहणा-या भारतीय नारी तुला सलाम!
Thursday, May 7, 2009
अंतर
निवडणुकीच्या निमित्ताने एका गावामध्ये गेले होते. माझ्याबरोबर एक पत्रकार मैत्रीण आणि तिचा फोटोग्राफर होता. तिथल्या स्थानिक संघटनेच्या लोकांनी आम्हांला शहरामध्ये फिरवू आणि बाकीची मदत करू म्हणून आश्वासन दिलं. त्यांचा एक कार्यकर्ता आम्हाला घ्यायला एसटी स्टँडवर आला. त्याच्याशी औपचारिक बोलणं झाल्यावर रिक्षा पकडून एका ठिकाणी जायचं निश्चित झालं. फोटोग्राफरला बाइकवरून पुढे पाठवलं. मग रिक्षात तो माणूस आणि आम्ही दोघी. गंमत म्हणजे रिक्षात बसताना त्या कार्यकर्त्याने आमच्या बाजूला बसण्याएवजी चालकाच्या बाजूला बसणं पसंत केलं. जरा विचित्र वाटलं. तो खरंतर त्यांच्या संघटनेच्या मिडीया सेलचा प्रमुख होता. प्रसिद्धीची सगळी जबाबदारी त्याच्यावर होती. पण आमच्याशी बोलताना तो कायम 'अन्कम्फर्ट' वाटत होता.
त्याच गावामध्ये मुक्कामासाठी आम्ही एक रूम आधीच बुक केली होती. फोटोग्राफर आयत्यावेळी आल्याने त्याला कुठे ठेवायचं हा प्रश्न होता. हॉटेलमध्ये एखादी रूम मिळेलच या आशेने तिथे पोहोचलो. पण मिळाली नाही. मग शेवटी त्याला आमच्या दोघींच्याच रूमवर आसरा दिला कारण मुख्य शहर तिथून तीन किलोमीटर होतं आणि दिवसभराच्या प्रवासने तिघेही थकलो होतो. दुस-या दिवशी काही लोक भेटायला आले. ते आम्हाला काही ठिकाणी घेऊन जाणार होते. त्यांनी झोप वगैरे नीट झाली ना विचारलं आणि बोलता बोलता सहज आम्ही 'तिघं' एकाच रूममध्ये मुक्काम केल्याचं त्यांना सांगितलं. त्या पुरुषांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. मग माझी 'रूढ' अर्थाने केलेली चूक माझ्या लक्षात आली.
त्यानंतर मुंबईमध्ये एका राजकीय पक्षाची मोठी सभा झाली. तिथे जाण्यासाठी त्या राजकीय पक्षाच्या काही कार्यकर्त्यांबरोबरच मी निघाले. गाडीमध्ये मागे तीन आणि पुढे दोन अशा जागा होत्या. अर्थात पुढच्या एका जागेवर ड्रायव्हर बसला. मागच्या जागांमध्ये मी आणि एक पत्रकार मित्र. तेवढ्यात त्या पक्षाचा ज्येष्ठ सदस्य किंवा असाच कोणीतरी एक माणूस गाडीपाशी आला. कदाचित ती गाडी त्याच्यासाठी असेल, पण आम्ही त्यात बसलो होतो. तोही आत कोण आहे हे न पाहता आत शिरला. पण मी मधल्या सीटवर बसले होते त्यामुळे लगेच बाहेर गेला आणि काय करायचं हे न सुचल्याने घुटमळत राहिला. मग मी ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्या माणसाला इथेच बसू ना असा प्रश्न विचारला. तर तो हो म्हणाला आणि त्या माणसाला त्याने पुढे बोलावून घेतलं. मग माझ्याबरोबर एक कार्यकर्ता येऊन बसला आणि गाडी सुरू झाली. बराचवेळ गाडीमध्ये शांतता होती. मग त्या कार्यकर्त्याने आमची त्याच्याशी ओळख करून दिली व थोडीफार जुजबी बातचीत झाली. पण अंतर मात्र कायम राहिलं. गाडीतून उतरल्यावर मात्र नजर चुकवणा-या त्याच्या नजरा माझाच वेध घेत असल्याचं मला जाणवलं. पण मग मीही त्या माणसाकडे एक कटाक्ष टाकून गर्दीत मिसळून जाऊन अंतर कायम ठेवणंच पसंत केलं.
तिसरा प्रसंगतर एखाद्या मराठी चित्रपटातल्यासारखा आहे. कृष्णधवल चित्रपटातला प्रसंग आठवा. एखादा मुलगा मुलीला बघायला जातो आणि प्रश्न विचारतो. ती मुलगी पदराशी चाळा करत मान खाली घालून लाजत उत्तर देते.
तस्संच झालं पण जरा उलट ! निवडणुकीला उभा राहणा-या एका उमेदवाराच्या घरी सभेच्या आधी चहापान चाललं होतं. मग बोलताना त्याला त्याच्या मतदारसंघाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. मी त्याला प्रश्न विचारला की तो उत्तर देताना मात्र माझ्या बाजूला बसलेल्या पत्रकाराकडे पाहून उत्तर द्यायचा. माझ्या डोळ्यात डोळे घालून तो पाहतच नव्हता. आधी मला विचित्र वाटलं. पण नंतर गंमत वाटयला लागली. मी त्याला मुद्दाम जास्त प्रश्न विचारायला लागले आणि त्यानेही माझ्याकडे न बघण्याचा 'पण' पूर्ण केला. घरातल्या महिलांसमोर तो ठीक होता. (कदाचित परस्त्री मातेसमान वगैरे संस्कार त्याच्या मनावर झाले असतील. पण मी त्याची माता म्हणजे टू मच!) सभेच्या ठिकाणी पोहोचलो तर महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. मला खूपच आसूरी आनंद मिळाला आता हा कसा भाषण करणार? त्याने भाषण केलं. पण महिलांचा विशेष उल्लेख न करता किंवा त्यांच्या थेट डोळ्यात न पाहता!
या सगळ्यांमध्ये आणखी एक प्रसंग नमूद करण्यासारखा आहे. मुक्कामाला एका हॉटेलमध्ये उतरले होते. तिथे टॉयलेटमध्ये कच-याचा डबा होता. त्याच्याबाजूला सॅनिटरी पॅड टाकून देण्यासाठी एक लहान कागदी पिशवी ठेवली होती. मी तिचा वापर केला. नंतर बाहेरून आल्यावर अर्थातच रूम साफ करून ठेवली होती आणि त्या डब्याजवळ आणखी दोन तशाच कागदी पिशव्या ठेवल्या होत्या. मला खूपच आश्चर्य वाटलं. ती रूम साफ करणारा एक मुलगा होता. त्याची जाणीव पाहून मी थक्क झाले. याने थोडं अंतर कमी करण्याच्या केलेल्या प्रयत्नाने समाधानीही!