Sunday, June 21, 2009

भविष्य नसलेली माणसं

आपण कशासाठी जगतो तर भविष्यात नक्कीच काहीतरी चांगलं वाढून ठेवलंय या आशेवर. भविष्याचा विचार करणं हा आपला स्थायीभाव आहे. एखादा मोठा निर्णय घेताना किंवा अगदी रोजची भाजी घेतानाही ती उद्यासाठी होईल असा विचार मनात येतोच. पण काही लोकांना भविष्यंच नसतं. फक्त भूतकाळ त्यांचा पिच्छा पुरवत राहतो. त्याच्या जोरावर जगायचं का मरायचं हेसुद्धा त्यांना समजत नाही.


कालच बहामन घोबाडीचा 'टर्टल्स कॅन फ्लाय' चित्रपट पाहिला आणि हेच विचार सतत मनात येत राहिले. इराक आणि तुर्कस्तानच्या सीमेवर हा चित्रपट घडतो. त्याला अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्याची पार्श्वभूमी आहे.

युद्धग्रस्त भागात राहणा-या मुलांच्या आयुष्याचं चित्रण यात आहे. त्यांना सुरुंग काढण्यासारखी करावी लागणारी धोकादायक कामं, त्यांचा मानसिक छळ, बलात्कार आणि त्यातून तयार होणारं त्यांचं भावविश्व याचा प्रत्यय चित्रपटात येतो. चित्रपट थोडासा प्रो-अमेरिकन असला तरी कथा खूप चांगली आहे.

भविष्य नसलेल्या मुलांच्या वास्तव आयुष्यातली दाहकता यानिमित्ताने पुढे येते. चित्रपट बाजूला ठेवून जगाचा विचार केला तर जगातील मध्य पूर्वेच्या अनेक देशांमध्ये युद्ध सुरू आहेत. अफगाणिस्तानसारखे अनेक देश बेचिराख झाले आहेत. पाकिस्तानसारखे देश विनाशाच्या दिशेने चालले आहेत. तिथल्या मुलांचं काय आयुष्य असेल कल्पनाच भयानक वाटते.

युद्धाचाच विषय निघाला आहे तर आठवलं की कालच संध्याकाळी सॅम्युअल बेकेटचं 'वेटींग फॉर गोदो' पाहिलं. सुरुवातीची १५ मिनिटं काय चाललंय हेच कळेना. जेव्हा नाटक समजायला सुरुवात झाली तेव्हा ते संपत आलं होतं. खूप विचार केला, मित्राशी चर्चा केली, त्याबद्दल इंटरनेटवर वाचलं आणि मग त्याची थीम थोडी लक्षात आली. आता जितकेवेळा त्याचा विचार मनात येतो तेवढे वेळा नवीनच अर्थ त्यातून उलगडल्यासारखा वाटतो.

दुस-या महायुद्धामध्ये नरसंहार मोठ्या प्रमाणात झाला. त्यात अनेकांचे जवळचे म्हणावेत असे लोक ठार झाले. भणंग लोकांची संख्या वाढली आणि त्यांना जगण्याची काहीच आशा उरली नाही. पण मरणार कसं. मनात विचार आला तरी मरण एवढं सोपं नाही. मग ते काय करतील? ते काय बोलतील? कसं जगतील? त्यांच्यासाठी काय आशावाद असेल? काय आयुष्य असेल? ते विचार काय आणि कसा करतील? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं गोदोमध्ये आहेत. पण ते पुन्हा बघायचंय किंवा वाचायचंय त्याशिवाय माझ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं सापडणार नाहीत.

अफलातून फिलॉसॉफी

माझ्या कार्यालयात एक माणूसही काम करतो. त्याचं नाव आणि काम माहित नाही पण माझ्याशी राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर तो गप्पा अनेकदा मारतो. त्याच्या फिलॉसॉफी अफलातून असतात.

आज तो सवयीप्रमाणे गप्पा मारायला आला, विषय होता देव. (त्याच्या आणि माझ्या संवादात फक्त तो बोलत असतो आणि मी एखादा दुसरा शब्दच बोलते.)

तोः हे साले लोक मूर्ख आहेत. त्या सिद्धीविनायकाभोवती भींत बांधलीये देवाचं रक्षण करायला. तरीही लोक त्याच्या पाया पडायला जातात की बाबारे माझं रक्षण कर. कोण कोणाचं रक्षण करणार तेच कळत नाही.
मीः खरं आहे.
तोः आता त्या लालबागच्या राजाला नवसासाठी पहाटेपासून रांगा लागतात. पण तुमच्या घरातला गणपती आणि लालबागचा गणपती वेगळा आहे का? हेच लोकांना कळत नाही.
मीः होय.

मुंबईच्या नावानं चांगभलं!

पाच बिझनेसमन एका रात्री अस्वस्थ होतात आणि मोबाईलवरून मेसेज पाठवून एकमेकांना भेटण्याची तारीख आणि वेळ निश्चित करतात. ते भेटतात तेव्हा त्यांच्यात एकच विषय असतो या शहराची वाट लागली आहे. घरासमोरच्या रस्त्यावर हॉकर्स बसतात, मॉलमध्ये फाल्तूच्या लोकांची संख्या वाढत आहे, पाणी एक तास कमीच येतं, हॉटेल मरिन ड्राइव्हमध्ये डिनरसाठी आजकाल वेटींग असतं.

एवढे गहन प्रश्न निर्माण झाल्याने काय करायचं. सगळ्यात आधी तर याला राजकारणी जबाबदार आहेत. मग वाढत्या झोपड्यांमुळे असं होतंय अशी मोठ्ठी कारणमीमांसा होते. त्यानंतर त्यांच्यातला 'चे गव्हेरा' जागा होतो आणि ठरतं की या अशा नालायक सरकारच्या विरोधात एकत्र यायचं आणि एनजीओ काढायची.

------------------------------------------------------------------------------------------------
एका प्रसिद्ध बापाचा अर्थातच एक प्रसिद्ध मुलगा असतो. तो एके दिवशी गाडीतून निघतो दुस-या ठिकाणी जायला आणि मोठ्याच संकटात सापडतो. गाडीचा रस्ता २०-२५ मिनिटांचाच असतो पण त्याला ट्रॅफिकमुळे तब्बल ४० मिनिटं लागतात. त्याला हे सहनच होत नाही.

मग त्याला या शहरासाठी काहीतरी करायची ऊर्मी येते आणि तो आपल्या मित्रमैत्रिणींना जमवतो. या शहराची कशी वाट लागली आहे आणि ते आपल्यालाच सुधारायचंय अशी वैचारिक चर्चा त्यांच्यामध्ये होते. मग ब्रेनस्टॉर्मिंग चर्चेचं फलित निघतं की एक एनजीओ काढला पाहिजे तरच या शहराचं भलं होईल शेवटी आपण इथेच राहत असल्याने आपलीही काही जबाबदारी आहे की नाही.

मग एनजीओचं उद्घाटन होतं आणि पुढच्या कार्यक्रमाची रुपरेषा पत्रकारांना सांगितली जाते. सगळ्यात पहिला कार्यक्रम मुंबई वनीकरणाचा. झाडं लावा झाडं जगवा. लवकरच या कार्यक्रमाची तारीख घोषित करण्यात येईल आणि आपणही त्यात सहभागी होऊ शकता.

(विशेष सूचनाः वर दिलेल्या दोन्ही घटना काल्पनिक नसून त्यांचा वास्तवाशी पूर्ण संबंध आहे. त्यातील पात्र, प्रसंग आपल्याला प्रत्यक्षात पाहिला मिळाल्यास तो केवळ योगायोग समजू नये ही विनंती.)

Thursday, June 18, 2009

बायकाही बलात्कार करू शकतात!

बॉलिवूड स्टार शायनी अहुजाने केलेल्या बलात्काराचे प्रकरण सध्या सगळीकडेच चर्चिलं जात आहे.
त्याने घरात कामाला येणा-या बाईवर बलात्कार केला हे अनेकांना सुरुवातीला खरंच वाटतं नव्हतं. पण आता मेडिकल रिपोर्टनी ते सिद्घ केलंय. या सगळ्यामध्ये त्याची बायको अनुपम त्याच्या मदतीला धावून आली यात गैर काहीच नाही. पण तिने त्या कामवाल्या बाईच्या विरोधात केलेलं विधान म्हणजे नव-याला वाचवण्याचा केलेला अत्यंत केविलवाणा प्रयत्न म्हणता येईल. ती म्हणाली 'बायकाही बलात्कार करू शकतात!'

इथे तिचं म्हणणं खरंही मानलं तरी ती बाई स्वतः बलात्कार करणार आणि त्याची तक्रार स्वतःच पोलिसांना करणार की तिच्यावर बलात्कार झाला आहे म्हणून.

आपल्या एखाद्या माणसाने अपराध केला म्हणून स्वतःची सद्सदविवेकबुद्धी बाजूला ठेवून त्याला वाचवू पाहणा-या भारतीय नारी तुला सलाम!