इथे ती म्हणजे अनेकदा मीच आहे (जरी जगभरातल्याच काय पण मुंबईतल्याही स्त्रियांचं प्रतिनिधीत्व मी करत नसले तरी). तो म्हणजे बदलत राहणारा पुरुष आहे. कधी या गावचा कधी त्या गावचा. पण या ती आणि तो मधलं (म्हणजे स्त्री आणि पुरुषामधलं) अंतर कसं अजूनही कायम आहे याचाच हे अनुभव.
निवडणुकीच्या निमित्ताने एका गावामध्ये गेले होते. माझ्याबरोबर एक पत्रकार मैत्रीण आणि तिचा फोटोग्राफर होता. तिथल्या स्थानिक संघटनेच्या लोकांनी आम्हांला शहरामध्ये फिरवू आणि बाकीची मदत करू म्हणून आश्वासन दिलं. त्यांचा एक कार्यकर्ता आम्हाला घ्यायला एसटी स्टँडवर आला. त्याच्याशी औपचारिक बोलणं झाल्यावर रिक्षा पकडून एका ठिकाणी जायचं निश्चित झालं. फोटोग्राफरला बाइकवरून पुढे पाठवलं. मग रिक्षात तो माणूस आणि आम्ही दोघी. गंमत म्हणजे रिक्षात बसताना त्या कार्यकर्त्याने आमच्या बाजूला बसण्याएवजी चालकाच्या बाजूला बसणं पसंत केलं. जरा विचित्र वाटलं. तो खरंतर त्यांच्या संघटनेच्या मिडीया सेलचा प्रमुख होता. प्रसिद्धीची सगळी जबाबदारी त्याच्यावर होती. पण आमच्याशी बोलताना तो कायम 'अन्कम्फर्ट' वाटत होता.
त्याच गावामध्ये मुक्कामासाठी आम्ही एक रूम आधीच बुक केली होती. फोटोग्राफर आयत्यावेळी आल्याने त्याला कुठे ठेवायचं हा प्रश्न होता. हॉटेलमध्ये एखादी रूम मिळेलच या आशेने तिथे पोहोचलो. पण मिळाली नाही. मग शेवटी त्याला आमच्या दोघींच्याच रूमवर आसरा दिला कारण मुख्य शहर तिथून तीन किलोमीटर होतं आणि दिवसभराच्या प्रवासने तिघेही थकलो होतो. दुस-या दिवशी काही लोक भेटायला आले. ते आम्हाला काही ठिकाणी घेऊन जाणार होते. त्यांनी झोप वगैरे नीट झाली ना विचारलं आणि बोलता बोलता सहज आम्ही 'तिघं' एकाच रूममध्ये मुक्काम केल्याचं त्यांना सांगितलं. त्या पुरुषांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. मग माझी 'रूढ' अर्थाने केलेली चूक माझ्या लक्षात आली.
त्यानंतर मुंबईमध्ये एका राजकीय पक्षाची मोठी सभा झाली. तिथे जाण्यासाठी त्या राजकीय पक्षाच्या काही कार्यकर्त्यांबरोबरच मी निघाले. गाडीमध्ये मागे तीन आणि पुढे दोन अशा जागा होत्या. अर्थात पुढच्या एका जागेवर ड्रायव्हर बसला. मागच्या जागांमध्ये मी आणि एक पत्रकार मित्र. तेवढ्यात त्या पक्षाचा ज्येष्ठ सदस्य किंवा असाच कोणीतरी एक माणूस गाडीपाशी आला. कदाचित ती गाडी त्याच्यासाठी असेल, पण आम्ही त्यात बसलो होतो. तोही आत कोण आहे हे न पाहता आत शिरला. पण मी मधल्या सीटवर बसले होते त्यामुळे लगेच बाहेर गेला आणि काय करायचं हे न सुचल्याने घुटमळत राहिला. मग मी ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्या माणसाला इथेच बसू ना असा प्रश्न विचारला. तर तो हो म्हणाला आणि त्या माणसाला त्याने पुढे बोलावून घेतलं. मग माझ्याबरोबर एक कार्यकर्ता येऊन बसला आणि गाडी सुरू झाली. बराचवेळ गाडीमध्ये शांतता होती. मग त्या कार्यकर्त्याने आमची त्याच्याशी ओळख करून दिली व थोडीफार जुजबी बातचीत झाली. पण अंतर मात्र कायम राहिलं. गाडीतून उतरल्यावर मात्र नजर चुकवणा-या त्याच्या नजरा माझाच वेध घेत असल्याचं मला जाणवलं. पण मग मीही त्या माणसाकडे एक कटाक्ष टाकून गर्दीत मिसळून जाऊन अंतर कायम ठेवणंच पसंत केलं.
तिसरा प्रसंगतर एखाद्या मराठी चित्रपटातल्यासारखा आहे. कृष्णधवल चित्रपटातला प्रसंग आठवा. एखादा मुलगा मुलीला बघायला जातो आणि प्रश्न विचारतो. ती मुलगी पदराशी चाळा करत मान खाली घालून लाजत उत्तर देते.
तस्संच झालं पण जरा उलट ! निवडणुकीला उभा राहणा-या एका उमेदवाराच्या घरी सभेच्या आधी चहापान चाललं होतं. मग बोलताना त्याला त्याच्या मतदारसंघाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. मी त्याला प्रश्न विचारला की तो उत्तर देताना मात्र माझ्या बाजूला बसलेल्या पत्रकाराकडे पाहून उत्तर द्यायचा. माझ्या डोळ्यात डोळे घालून तो पाहतच नव्हता. आधी मला विचित्र वाटलं. पण नंतर गंमत वाटयला लागली. मी त्याला मुद्दाम जास्त प्रश्न विचारायला लागले आणि त्यानेही माझ्याकडे न बघण्याचा 'पण' पूर्ण केला. घरातल्या महिलांसमोर तो ठीक होता. (कदाचित परस्त्री मातेसमान वगैरे संस्कार त्याच्या मनावर झाले असतील. पण मी त्याची माता म्हणजे टू मच!) सभेच्या ठिकाणी पोहोचलो तर महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. मला खूपच आसूरी आनंद मिळाला आता हा कसा भाषण करणार? त्याने भाषण केलं. पण महिलांचा विशेष उल्लेख न करता किंवा त्यांच्या थेट डोळ्यात न पाहता!
या सगळ्यांमध्ये आणखी एक प्रसंग नमूद करण्यासारखा आहे. मुक्कामाला एका हॉटेलमध्ये उतरले होते. तिथे टॉयलेटमध्ये कच-याचा डबा होता. त्याच्याबाजूला सॅनिटरी पॅड टाकून देण्यासाठी एक लहान कागदी पिशवी ठेवली होती. मी तिचा वापर केला. नंतर बाहेरून आल्यावर अर्थातच रूम साफ करून ठेवली होती आणि त्या डब्याजवळ आणखी दोन तशाच कागदी पिशव्या ठेवल्या होत्या. मला खूपच आश्चर्य वाटलं. ती रूम साफ करणारा एक मुलगा होता. त्याची जाणीव पाहून मी थक्क झाले. याने थोडं अंतर कमी करण्याच्या केलेल्या प्रयत्नाने समाधानीही!
Subscribe to:
Posts (Atom)