आपण कशासाठी जगतो तर भविष्यात नक्कीच काहीतरी चांगलं वाढून ठेवलंय या आशेवर. भविष्याचा विचार करणं हा आपला स्थायीभाव आहे. एखादा मोठा निर्णय घेताना किंवा अगदी रोजची भाजी घेतानाही ती उद्यासाठी होईल असा विचार मनात येतोच. पण काही लोकांना भविष्यंच नसतं. फक्त भूतकाळ त्यांचा पिच्छा पुरवत राहतो. त्याच्या जोरावर जगायचं का मरायचं हेसुद्धा त्यांना समजत नाही.
कालच बहामन घोबाडीचा 'टर्टल्स कॅन फ्लाय' चित्रपट पाहिला आणि हेच विचार सतत मनात येत राहिले. इराक आणि तुर्कस्तानच्या सीमेवर हा चित्रपट घडतो. त्याला अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्याची पार्श्वभूमी आहे.
युद्धग्रस्त भागात राहणा-या मुलांच्या आयुष्याचं चित्रण यात आहे. त्यांना सुरुंग काढण्यासारखी करावी लागणारी धोकादायक कामं, त्यांचा मानसिक छळ, बलात्कार आणि त्यातून तयार होणारं त्यांचं भावविश्व याचा प्रत्यय चित्रपटात येतो. चित्रपट थोडासा प्रो-अमेरिकन असला तरी कथा खूप चांगली आहे.
भविष्य नसलेल्या मुलांच्या वास्तव आयुष्यातली दाहकता यानिमित्ताने पुढे येते. चित्रपट बाजूला ठेवून जगाचा विचार केला तर जगातील मध्य पूर्वेच्या अनेक देशांमध्ये युद्ध सुरू आहेत. अफगाणिस्तानसारखे अनेक देश बेचिराख झाले आहेत. पाकिस्तानसारखे देश विनाशाच्या दिशेने चालले आहेत. तिथल्या मुलांचं काय आयुष्य असेल कल्पनाच भयानक वाटते.
युद्धाचाच विषय निघाला आहे तर आठवलं की कालच संध्याकाळी सॅम्युअल बेकेटचं 'वेटींग फॉर गोदो' पाहिलं. सुरुवातीची १५ मिनिटं काय चाललंय हेच कळेना. जेव्हा नाटक समजायला सुरुवात झाली तेव्हा ते संपत आलं होतं. खूप विचार केला, मित्राशी चर्चा केली, त्याबद्दल इंटरनेटवर वाचलं आणि मग त्याची थीम थोडी लक्षात आली. आता जितकेवेळा त्याचा विचार मनात येतो तेवढे वेळा नवीनच अर्थ त्यातून उलगडल्यासारखा वाटतो.
दुस-या महायुद्धामध्ये नरसंहार मोठ्या प्रमाणात झाला. त्यात अनेकांचे जवळचे म्हणावेत असे लोक ठार झाले. भणंग लोकांची संख्या वाढली आणि त्यांना जगण्याची काहीच आशा उरली नाही. पण मरणार कसं. मनात विचार आला तरी मरण एवढं सोपं नाही. मग ते काय करतील? ते काय बोलतील? कसं जगतील? त्यांच्यासाठी काय आशावाद असेल? काय आयुष्य असेल? ते विचार काय आणि कसा करतील? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं गोदोमध्ये आहेत. पण ते पुन्हा बघायचंय किंवा वाचायचंय त्याशिवाय माझ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं सापडणार नाहीत.