गेले काही दिवस खूपच गडबडीत गेले. त्यामुळे मनात असूनही अनेक गोष्टी लिहिताच आल्या नाही. आज जरा वेळ मिळालाय. त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा विचार आला तो महाराष्ट्र गेले काही दिवस ज्या उत्तर भारतीय द्वेषाने पेटून उठला आहे त्याचा.
शुल्लकशा वाटणाऱ्या एका आंदोलनाचे आज महाराष्ट्रच नव्हे तर सबंध देशभरात पडसाद उमटना दिसत आहेत. भैय्यांविरोधात सुरू झालेलं हे आंदोलन आता पूर्णपणे राजकीय वळण घेताना दिसतं.
पण वैयक्तिक पातळीवर विचार केला तर खरोखरच या उत्तर भारतीयांपासून आपल्याला धोका आहे का, हा मोठा प्रश्नच मला पडतो.
या संपूर्ण आंदोलनाचा मी कदाचित संकुचित वाटेल अशा पद्धतीने विचार केला आणि काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. म्हणजे बघा की माझ्या आयुष्यात मला कुठे कुठे उत्तर भारतीय किंवा बिहारींशी व्यवहार करावा लागतो किंवा लागला आहे. ते करताना मला कधी असं वाटलं का की यापेक्षा एखादा मराठी माणूस असता तर जास्त बरं झालं असतं.
अगदी कालेजच्या दिवसांपासून सुरूवात करूया. मला कोमल नावाची एक उत्तर भारतीय मैत्रीण आहे. जयहिंदमध्ये एफवाय बीएस्सीला असताना तिच्याशी ओळख झाली. अभ्यासात ती खूपच हुशार कायम पहिली आणि मी कधीच अभ्यास गांर्भीयाने न घेणारी. तरीही आमचं ट्युनिंग उत्तम जुळलं. तिच्यामुळे खरंतर मला थोडाफार अभ्यास करावासा वाटू लागला.
कोमलचा आणखी एक स्वभाव म्हणजे एखादी गोष्टी शेअर करणं. मग अभ्यास असो किंवा जेवणाचा डबा. एखादी वस्तू दुसऱ्याला देताना तिला कधीच इनसेक्युअर वाटलं नाही किंवा आपल्याकडे काही कमी झाल्याची भावनाही आली नाही. तिचा स्वभावही खूप मृदू आणि कोणालाही आपलंसं करेल असा.
सगळ्यात महत्त्वाचं तिला उत्तम मराठी, हिंदी, गुजराती आणि अर्थात इंग्रजी बोलता येतं. तिचं कुटुंबही साधं लोप्रोफाईल म्हणता यंईल असं. तिच्यापेक्षा एखादी मराठी मैत्रिण असती तर मला काही आणखी चांगला अनुभव आला असता असं मुळीच वाटत नाही.
मग काँलेजमधलाच माझा एक मित्र राम. हाही उत्तर भारतीय. खूपच गरीब कुटुंबातून आलेला. दिवसभर लायब्ररीत बसणारा आणि जाड जाड पुस्तकांचं वाचन करणारा. अभ्यमात्र हुशार. काँलेज नसताना भावाबरोबर तो वांद्र्याच्या एका थिएटरमध्ये तिकीट चेकरचं काम करायचं कारण तेवढेच पैसे सुटायचे. आता त्याने आयआयटी खड्कपूरमधून एमटेक केलंय.
त्याचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे जिद्द. स्वतःच्या जीवावर त्याने त्याचे शिक्षण केलं आणि आज तो आयुष्यात सेटल होत आहे. शेवटच्या वर्षी तो फिजिक्सचा टाँपर होता काँलेजमधून. मला त्याने केलेली सगळ्यात मोठी मदत म्हणजे फिजिक्स प्रॅक्टीकलसाठी. फायनल परीक्षेला प्रॅक्टिकल आणि व्हायवा होते. त्यामध्ये काहीही प्रश्न विचारतात. अनेकांना या तोंडी परीक्षेचीच जास्त भीती वाटायचीय, मलाही. पण रामने माझ्याकडून इतका सराव करून घेतला की परीक्षक माझ्यावर खूष झाले आणि रामनंतर मला प्रॅक्टिकलमध्ये सर्वात जास्त गुण होते.
रामशी खूप संपर्क नाही पण आता मात्र त्याला फोन करावासा वाटतो आहे.
मग दैनंदिन कामाचं म्हणाल तर दुध-दहीवाला भैय्या आहे. इस्त्रीवाला, रद्दीवाला, किराणावाला, टॅक्सीवाला अगदी रोज ज्याच्याकडे मी ज्यूस पिते तोही भैय्याच आहे. यांच्या जागी मी मराठी दुकानदारांकडे जाऊ शकते. पण आधी ते शोधावे लागतील. बरं तसे मराठी शोधल्यावर काय होणार, महाराष्ट्राचा विकास की भैय्यांना अद्दल घडणार. जर स्पर्धा करायचीच असेल तर ते देत असलेली सेवा आपण देऊ शकतो का याचा आधी विचार व्हायला हवा. विशिष्ट लोकांना हाकलवून मराठी माणसाचा किंवा महाराष्ट्राचा विकास झाला तर त्या यादीत भैय्या नसतील काही वेगळ्याच लोकांची नावं टाकावी लागतील.
No comments:
Post a Comment