Monday, January 19, 2009

नक्षलवाद्यांच्या प्रांतात!



खरंतर या अनुभवाबद्दल खूप आधीच लिहायला हवं होतं. पण कंटाळा केला. एका मित्राने काही फोटो पाठवल्याने पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या आणि नकळत त्याबद्दल लिहायला घेतलं.


नागपूरच्या ट्रीपमध्ये सगळ्यात एक्सायटींग अनुभव हा गडचिरोलीला जाण्याचा होता. हा भाग नक्षलवाद्यांसाठी प्रसिद्ध असल्याने तिथे कधीच न गेलेल्या माणसांची एकच कल्पना असते की नक्षलवादी हे कोणीतरी धोकादायक आणि खतरनाक लोक आहेत.


मी जेव्हा इतर पत्रकार मित्रांसोबत तिथे जायचं ठरवलं तेव्हा माझ्या काही हितचिंतकांनी बऱ्याच शंका उपस्थित केल्या. एकतर २४ डिसेंबरच्या रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास आम्ही सहा जण निघालो आणि नागपूरपासूनचा रस्ता साधारण ३५० किलोमीटरचा होता.


त्यामुळे आम्ही सुखरूप कसे पोहोचणार, बरोबर माहितगार कोण आहे इथपासून ते अगदी प्रोटेक्शन घेतलंय का इथपर्यंत प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे माझ्या मनातही उगाचच शंका निर्माण झाल्या. त्या भागाची फारशी माहिती नसताना आपण उगाच धाडस वगैर करत नाही ना, असं काही क्षणांसाठी वाटून गेलं.


पण मग माझ्या खास मित्राने लक्षात आणून दिलं की नक्षलवादी हे दहशतवादी नाहीत की जे सामान्य लोकांवर हल्ले करतील. त्याचं म्हणणं अगदी बरोबर होतं आणि प्रवास संपताना तर या सगळ्या गोष्टींबद्दल खूप हसायला आलं.


नागपूरहून उमरेडकडे गेल्यावर आमच्या गाडीने स्पीड घेतला. जशजशी गावं मागे पडू लागली तशी जंगल गर्द होत गेल्याची जाणीव झाली. मिट्ट काळोख त्यातून आमची टाटा सुमो, ना समोरून गाडी ना मागून गाडी. कितीतरी वेळ असाच एकाकी प्रवास सुरू होता. गाडीचे लाईट जेवढ्या लांब जातील तेवढंच काय ते दिसायचं मागं वळून पाहिलं की पुन्हा अंधाराचं साम्राज्य.


अगदीच नाही म्हणालया दोन-चार रान मांजरी काय त्या दिसल्या. पण इतर प्राणी किंवा पक्ष्यांनी काही दर्शन दिलं नाही. गप्पा मारत, अर्धवट झोपत प्रवास चालला होता. फक्त भीती सुरूंगांची वाटत होती. नक्षलवादी आजकाल पोलिसांसाठी रस्त्यावर सुरूंग पेरून ठेवत असल्याने पुढे बसलेले दोघेजण प्रामाणिकपणे रस्त्यावर नजर ठेवून होते.


मग नक्षलवाद्यांच्या प्रांतात आम्ही प्रवेश केला. त्या भागात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात अनेक चकमकी झाल्या होत्या. इतरांकडून त्याबद्दलच्या गोष्टी एकता एकता पहाटे तीन-साडेतीनला आलापल्ली या गावी पोहोचलो. रात्रीच्या अंधारात गावाबद्दल काही कल्पना येणं शक्यच नव्हतं. पण एवढ्या थंडीच्या रात्रीही आमची एकजण फार आतुरतेने वाट पाहत होता तो म्हणजे महेश तिवारी.


महेश ई टीव्हीचा पत्रकार असून तो मूळचा सिरोंचाचा आहे. त्याच्याच आग्रहाखातर आम्ही तिकडे गेलो आणि निघेपर्यंतचा प्रत्येक क्षण त्याच्या पाहुणचाराचा आस्वाद घेत होतो.


थोडी विश्रांती घेऊन पुन्हा सकाळी आठ वाजता आमचा प्रवास सिरोंचाच्या दिशेने सुरू झाला. सिरोंचा हे गावं महाराष्ट्राच्या सीमेवर येतं, मध्य प्राणहिता नदी आणि मग आंध्रप्रदेश सुरू होतो. सिरोंचाचं दुसरं महत्त्व म्हणजे आंध्रप्रदेशातून नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रात याच मार्गे प्रवेश केला असं म्हटलं जातं.
रस्त्यात एका पोलीस स्टेशनला भेट दिली. ते पोलीस स्टेशन नुकतंच बांधलं होतं त्यामुळे कॉन्स्टेबलना रहायला एक तात्पुरता उभारलेला तंबू होता. तिथे पोलिसांशी खूप वेळ गप्पा आणि चहापान झालं. त्यांच्या बोलण्यातून प्रकर्षाने दोन गोष्टी पुढे आल्या. एकतर नक्षलवादी दिसला की मारायचा हे त्यांच्या मनात भिनलं होतं. दुसरं म्हणजे तो भाग खूपच दुर्लक्षिला गेल्याने लोकांनी न घाबरता या भागाला भेट द्यावी अशी विनंती ते वारंवार करत होते.


तिथून पुढे जाताना जंगल सागाच्या झाडांनी आणि तेंदूने भरलं होतं. पण सागाची बेसमुरास तोडही झाली होती. मोठ्या प्रमाणात कापूस आणि मिरच्यांची शेतीही लागली. भात म्हणजेच तिथे प्रसिद्ध असलेलं धान त्याची गोदामंही पाहिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली ही नैसर्गिक संपत्ती पाहून मी खूप भारावून गेले. एक विचार सहज मनामध्ये चमकून गेला की नक्षलवादी नसते तर कदाचित हे सगळं जंगलंच आपल्यासारख्या शहरी भामट्यांनी एव्हाना लुटून नेलं असतं. नक्षवाद्यांच्या भीतीमुळे याकडे कोणाचं फारसं लक्ष गेलेलं नसावं.


मग सिरोंच्याला पोहोचल्यावर महेशच्या घरी गेलो आणि पाहुणचार घेतला. तिथून नदीमार्गे आंध्रप्रदेशात गेलो. महेशशी आणि इतर स्थानिक लोकांशी गप्पा मारताना लक्षात आलं की इथल्या लोकांना महाराष्ट्रापेक्षा आंध्रप्रदेश जास्त जवळचा आहे. एकतर अंतर कमी आहे. महाराष्ट्रापेक्षा स्वस्ताई आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीमाल विकण्यासाठी, बाजार म्हणून आंध्रला पसंती देतात. फोनसारख्या सुविधाही आंध्रनेच या भागांमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


प्राणहिता नदीमधून फेरफटका मारणं खूपच चांगला अनुभव होता. निळंपाणी एका बाजूला शेती तर दुसऱ्या काठावर माळरान. या नदीच्या पाण्यावर महाराष्ट्रातला शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पण आंध्रप्रदेश सरकार मात्र यावर धरण बांधण्याच्या विचारात असल्याने पुढच्या काही वर्षात महाराष्ट्राला पाणी मिळणार नाही, अशी भीती व्यक्त केली जाते.


मग संध्याकाळी एका ब्रिटिशकालीन गेस्टहाऊसच्या गच्चीवर गेलो. सिरोंचामधील ही उंच इमारत. तिथून प्राणहिता नदीच्या कुशीमध्ये वसलेलं हे लहानसं गावं एवढं छान दिसत होतं की निघावसंच वाटत नव्हतं. पण खरं दृश्य तरी आम्ही पाहायचं बाकी होतं.


तिथून साधारण ४० किलोमीटरवर असलेल्या सोमनूरच्या दिशेने आम्ही निघालो. बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असल्याने धीम्या गतीने गाडी चालली होती. पण जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा डोळे विस्फारले गेले. महाराष्ट्राच्या सीमेवर आम्ही उभे होतो. समोर उजव्या हाताला आंध्रप्रदेश तर त्याच्याचवर छत्तीसगडची सीमा आणि मधून वाहणारी स्फटीकासारखी शुभ्र नदी. तिनही राज्यांचे त्रिकोण एकत्र आले होते. नदीच्या जवळचा माळ सोडला तर कीर्र आणि हिरवंगार जंगल. त्यातच आंध्रच्या भूमीवर मावळणारा सूर्य आणि त्याच्या प्रतिबिंबाने पाण्यावर टाकलेला झोत. माणसांचा काहीच मागमूस नाही फक्त निसर्गाची रूपं मन मोहावून टाकत होती. पण दिवस मावळल्याने तिथून निघणं भाग होतं. पुन्हा या भागामध्ये नक्षलवादी संध्याकाळी गावामध्ये येतात आणि याच भागातून इतर राज्यांमध्ये जातात, अशीही एक कथा एकायला मिळाली. शेवटी परतीचा प्रवास सुरू झाला.


परतीच्या प्रवासात या भागाबद्दल असलेल्या अनेक चुकीच्या कल्पना गळून गेल्या होत्या. उलट नवीन अनुभवाने मनाला उभारी दिली होती.


गडचिरोली म्हटलं की नक्षलवाद असा ठपका ठेवून आपण मोकळे होतो. पण हे करत असताना नक्षलवाद म्हणजे काय आणि तो का सुरू झाला याची माहितीही अनेकदा नसते. पण या नक्षलवादाच्या पलीकडेही इथे सर्वसामान्य लोक राहतात आणि ती सर्वसामान्य आयुष्य जगतात याकडे जरा पहायला हवं. हा भाग खरोखरच दुर्लक्षित आहे. नक्षलवाद्यांना मारण्यासाठी किंवा त्याचा बीमोड करण्यासाठी सरकार जो निधी देतं त्याचा काही भाग जरी स्थानिक लोकांना दिला तर त्यांच्या काही प्राथमिक गरजा भागू शकतील. स्थानिकांना मग नक्षलवादाची मदत घ्यायची गरज पडणार नाही.


पण कोणत्याही समाजाचा इतिहास पाहिला तर असं दिसतं की, जेव्हा अन्यायाचा अतिरेक होतो तेव्हा नक्षलवादासारख्या प्रवृत्ती जन्माला येतातच. पण त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होण्याएवजी त्यांना मारून टाकण्याकडे समाजाचा कल दिसतो. त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्राचा आपल्याच या वेगळ्या पाडलेल्या भागाशी संवाद वाढला तर काही आशा निर्माण होतील.



No comments: