आपल्याकडे सौंदर्याविषयीचे समज इतके पक्के आहेत की शारीरिक सौंदर्याच्या पलीकडेही काही असू शकतं हे आपण मान्य करत नाही किंवा समजून घेत नाही. उदाहरणच घ्या स्त्रियांचं सौंदर्य केसांवर ठरतं. ते किती लांब, जाड, काळे वगैरे आहेत. पण एखाद्या बाईला जर केसच नसतील तर? तेसुद्धा हॉलीवूडच्या एका सौंदर्यवतीला?
हो! २००२च्या बाँडपटातून 'डाय अनादर डे'मधून अनेकांना घायाळ करणारी हेल बेरी तिच्या आगामी चित्रपटात 'नॅपिल्ली एव्हर आफ्टर'मध्ये चक्क टक्कल करणार आहे.
हा चित्रपट हलकाफुलका, विनोदी असला तरी त्याची कथा ही मात्र एक समस्या समोर आणणारी आहे. सतत गळणा-या केसांना वैतागून हेल बेरी संपूर्ण केस काढून टाकते. पण त्यामुळे तिला किती सामाजिक समस्यांना तोंड द्यावं लागतं ते चित्रपटातच पाहायला मिळेल.
हेल स्वत: या चित्रपटातील लुकबाबत मनाशी ठाम नाही. सगळे केस काढून टाकणं आणि लोकांसमोर उभं राहणं तिच्यासाठी कठीण असल्याचं ती सांगते. पण या चित्रपटातील कथा तिला आणि केसांच्या सौंदर्याबाबत कायम काळजीत असणा-या सगळ्या महिलांना एक शिकवण देईल, अशी आशाही तिला वाटते. कदाचित हा चित्रपट पाहून मलाही केस गळल्यावर खूप वाईट वाटणार नाही.
पण कल्पना करा की खरोखरंच तिचा लुक प्रेक्षकांना अपील झाला तर...
...तर काय सगळ्या तरुणी तसा हेअर(पूर्ण)कट करण्यासाठी ब्युटी पार्लरच्याबाहेर रांगा लावतील. कदाचित त्यांना काही तास, दिवसही रांगेत थांबावं लागेल कारण संपूर्ण केस कापण्यासाठी जरा वेळच लागेल ना!
मग या हेअरकटचे दर खूप वाढतील. हा हेअरकट करणारे वेगळे एक्सपर्ट असतील. त्यांच्या खास मुलाखती प्रत्येक न्यूजचॅनेलवर पाहायला मिळतील.
त्याचवेळी दुसरीकडे शॅम्पू, कंडिशनर, केसांचं तेल या कंपन्यांचे मात्र धाबे दणाणतील. त्यांचे सेल कड्यावरून ढकलून दिल्याप्रमाणे एकदम घसरतील. गळणा-या केसांवर हमखास उपचार करणारे अनेक डर्मिटॉलॉजिस्ट आणि ट्रायकॉलॉजिस्टही अडचणीत येतील. मग या कंपन्या आणि तज्ज्ञ काहीही करून या चित्रपटाचं प्रेक्षपण थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय लेव्हलवर हरएक प्रयत्न करतील.
हेल बेरीला जगभरामध्ये केवळ याच विषयावर बोलण्यासाठी आमंत्रणांची रीघ लागेल. मग तिच्या आयुष्याला या कंपन्यांपासून धोका निर्माण होईल. तिला किडनॅप करण्याचे प्लॅन आखले जातील.
पण यातून आणखी काही समस्या निर्माण होतील, जसं कापलेल्या केसांचं करायचं काय? महापालिका हे केस डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यापासून अटकाव करणारा नियम काढेल. या केसांपासून विग बनवले तरी ते घेणार कोण असा प्रश्न असल्याने तोही उपयोग होणार नाही. मग वेस्टमधून बेस्ट निर्मिती करणा-या काही घरगुती महिला सखी-दुखी सारख्या दुपारी लागणा-या कार्यक्रमात या केसांच्या पिशव्या, शोपीस, फ्लॉवरपॉट, पेंटींग असं काहीतरी कलाकृती करतील. पण तरीही त्यांची संख्या संपणारी नसेल.
अंडरवर्ल्डवालेही या संधीचा फायदा घेतील. महागडी आधुनिक शस्त्र स्मगल करण्यापेक्षा केसाने गळा कापणं सोपं असल्याने ते केसांचे पुंजके जमा करून घोड्याएवजी तेच कमरेला लावून फिरतील.
हे सगळं होत असतानाच एक दिवस अचानक सगळ्या वर्तमानपत्रात जाहिरात येईल. त्यात हेल बेरीला पहिल्यासारखी केसांसकट दाखवली जाईल आणि तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा त्यात असेल 'हॅपिली हेअर आफ्टर!'