Sunday, August 16, 2009
शाहरूखच्या निमित्ताने
याच घटनेच्या काही दिवस आधी इम्रान हाश्मी याला तो मुसलमान असल्याने घर नाकारण्यात आलं होतं आणि समाजात पुन्हा एकदा मुस्लिमांच्या स्थितीबद्दल उलट-सुलट चर्चा झाली. मग त्यानेच या परिस्थितीपासून घुमजाव करत आपल्याला चुकीची माहिती मिळाल्याचे सांगितले. त्याआधी शबाना आझमीनेही असाच आरोप केला होता की मुस्लिमांना या देशामध्ये घर मिळणंही मुश्कील झालं आहे.
महाराष्ट्र सरकारने गेल्या महिन्यात एक विचित्र निर्णय घेतला. ज्या मुस्लीम मुलांनी हिंदू मुलींशी विवाह केला आहे त्यांची सीआयडीमार्फत चौकशी करणार. कारण काय त्यांना जबरदस्तीने हा विवाह करायला भाग पाडण्यात आलं आहे, असं एका मंत्र्याचं स्वतःचंच अनुमान.
पहिल्या तीन घटना या प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्तींबरोबर घडल्या आणि त्यांना लगेच प्रसिद्धी मिळाली. पण असे अनेक मुस्लिम आहेत की ते केवळ सर्वसामान्य असल्याने त्यांच्याबरोबर घडलेल्या अशा घटना प्रकाशझोतात येत नाहीत.
काही महिन्यांपूर्वी कामानिमित्त मालेगावला गेले होते. तिथे काही बायका भेटल्या. एक वर्षाहून अधिक काळ त्यांचे नवरे हे जेलमध्ये होते, मुंबईत झालेल्या विविध बॉम्बस्फोटांच्या आरोपावरून. आता खरे आरोपी सापडूनही त्यांना सोडण्यासाठी सरकारचे काही विशेष प्रयत्न नाहीत. पुन्हा आपले नवरे परत येतील याची शाश्वती त्यांना नाही.
अलीकडेच लष्करची अतिरेकी म्हणून मारण्यात आलेल्या खालसा कॉलेजमधल्या इशरत जहॉं या विद्यार्थीनीची केस सुप्रीम कोर्टाने पुन्हा तपासणीसाठी उघडली.
दुबईत नोकरीसाठी गेलेल्या आणि भारतात काही दिवसांसाठी परत आलेल्या ख्वाजा युनूसलाही मुंबई पोलिसांनी बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली पकडलं आणि तो कोठडीतून फरार झाल्याचं सांगितलं. पण तो आजपर्यंत सापडलेला नाही.
संसदेवर झालेल्या हल्ल्यामध्ये पकडण्यात आलेल्या आरोपींना कोर्टाने निर्दोष म्हणून सोडून दिले त्यावेळी पोलिसांनी त्यांना आरोपी म्हणून अडकवण्यासाठी कायदे कसे वळवले होते हे तर जगाच्याच समोर आलं.
भारतात अशा घटना अनेक वर्ष घडत आहेत. त्यांचं समर्थन होऊच शकत नाही. पण केवळ सेलिब्रिटी असल्याने त्यांना वेगळा न्याय आणि गोरगरिबांना मात्र त्यांचा लढाही लढता येऊ नये असं का होतं ?
इम्रान हाश्मीला घर मिळालं नाही म्हणून बॉलिवूडचे अनेक दिग्गज धावून आले, शाहरूखच्या चौकशीविरोधात सरकारने टिट फॉर टॅट म्हणून पत्रक काढलं. पण हीच प्रतिक्रिया सामान्य मुस्लिमांबद्दल मात्र नसते.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा शाहरूखच्या प्रकरणाच्या निमित्ताने पुढे आला. अमेरिकन यंत्रणांबद्दल वृथा अभिमान बाळगणारे काही भारतीय आहेत. ९य११ नंतर अमेरिकेवर हल्ला झाला नाही कारण त्यांनी यंत्रणा तशी सज्ज केली. पण भारतावर मात्र आजही दहशतवादी हल्ले होत आहेत, असं त्यांचं आर्ग्युमेंट असतं. (म्हणून अमेरिका ग्रेट ! ) पण स्वतःचा आत्मघात करायचा ठरवलेला माणूस कितीही सुरक्षा असली तरी ती भेदू शकतो याकडे मात्र दुर्लक्ष होतं. पुन्हा तिथे प्रत्येक मुसलमानावर जर संशयाची सुई असेल तर त्यांना जगणं केवळ अशक्य आहे.
पण हे थांबणार कसं हा प्रश्न मला कायम भेडसावतो.
Wednesday, July 1, 2009
लोकशाहीचे जवान
लोकसभा निवडणुकीमध्ये जम्मू आणि काश्मीरमधल्या संस्कार प्रांतातल्या केवळ ४७ मतांसाठी निवडणूक अधिका-यांनी कल्पनेपलीकडची कसतर केली. त्यामुळेच त्या ४७ जणांना त्यांचा मतदानाचा मूलभूत हक्क बजावता आला.
लडाखच्या संस्कार प्रांतामध्ये फेमा आणि रोलेटुंग या दोन मतदारसंघांमध्ये अनुक्रमे १४ आणि २३ मतदार होते. सुमारे १६ हजार फूट उंचीवर असलेल्या या गावांमध्ये हॅलिकॉप्टर पोहोचणं केवळ अशक्य होतं. मग शेवटी दोन शेर्पांना सोबत घेऊन मतदान अधिकारी मतपेट्या पाठीवर लादून चक्क ट्रेक करत निघाले. खूप मोठ्या प्रमाणात बर्फाळ असलेल्या या प्रदेशातून रात्रीच्यावेळी वाटचाल करणं त्यांनी पसंत केलं कारण सकाळी बर्फ वितण्याची भीती होती.
आठ तास चालल्यावर गुहेमध्ये मुक्काम केला. त्यांच्याजवळ आधाराला फक्त मेणबत्त्याच होत्या. अशा सगळ्या बिकट परिस्थितीवर मात करत त्यांची वाटचाल सुरू राहिली. दोन दिवसांनी अखेर अधिकारी या दोन्ही गावांमध्ये पोहोचले. मग प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ४६ जणांनी मतदान केलं आणि एकाने मतदान न करणं पसंत केलं.
पुन्हा खाली उतरून मतमोजणी करणं केवळ अशक्य होतं. शिवाय काश्मिरमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान झालं होतं आणि १६ मे रोजी निकाल जाहीर करण्याचं आधीच ठरलं होतं. मग इथल्या अधिका-यांना विशेष परवानगी देण्यात येऊन तिथेच मतमोजणी झाली आणि तो संदेश दिल्लीच्या मुख्य निवडणूक कार्यालयात पोहोचला तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. या दोन गावांतील मतदानाचे निकाल हाती आल्याने ख-या अर्थाने देशाच्या प्रत्येक कोप-यातील नागरिकाला मतदानाचा अधिकार बजावता आला होता.
हा निकाल हाती पडताच संपूर्ण देशाचा निकाल हाती घेऊन वचन दिल्याप्रमाणे चावला अर्धातासच उशिरा राष्ट्रपतींना भेटले. राष्ट्रपती भवनाच्या पाय-या चढताना त्यांच्या मनात अशा अधिका-यांबद्दल खूप अभिमान दाटून आला होता.
Sunday, June 21, 2009
भविष्य नसलेली माणसं
आपण कशासाठी जगतो तर भविष्यात नक्कीच काहीतरी चांगलं वाढून ठेवलंय या आशेवर. भविष्याचा विचार करणं हा आपला स्थायीभाव आहे. एखादा मोठा निर्णय घेताना किंवा अगदी रोजची भाजी घेतानाही ती उद्यासाठी होईल असा विचार मनात येतोच. पण काही लोकांना भविष्यंच नसतं. फक्त भूतकाळ त्यांचा पिच्छा पुरवत राहतो. त्याच्या जोरावर जगायचं का मरायचं हेसुद्धा त्यांना समजत नाही.
कालच बहामन घोबाडीचा 'टर्टल्स कॅन फ्लाय' चित्रपट पाहिला आणि हेच विचार सतत मनात येत राहिले. इराक आणि तुर्कस्तानच्या सीमेवर हा चित्रपट घडतो. त्याला अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्याची पार्श्वभूमी आहे.
युद्धग्रस्त भागात राहणा-या मुलांच्या आयुष्याचं चित्रण यात आहे. त्यांना सुरुंग काढण्यासारखी करावी लागणारी धोकादायक कामं, त्यांचा मानसिक छळ, बलात्कार आणि त्यातून तयार होणारं त्यांचं भावविश्व याचा प्रत्यय चित्रपटात येतो. चित्रपट थोडासा प्रो-अमेरिकन असला तरी कथा खूप चांगली आहे.
भविष्य नसलेल्या मुलांच्या वास्तव आयुष्यातली दाहकता यानिमित्ताने पुढे येते. चित्रपट बाजूला ठेवून जगाचा विचार केला तर जगातील मध्य पूर्वेच्या अनेक देशांमध्ये युद्ध सुरू आहेत. अफगाणिस्तानसारखे अनेक देश बेचिराख झाले आहेत. पाकिस्तानसारखे देश विनाशाच्या दिशेने चालले आहेत. तिथल्या मुलांचं काय आयुष्य असेल कल्पनाच भयानक वाटते.
युद्धाचाच विषय निघाला आहे तर आठवलं की कालच संध्याकाळी सॅम्युअल बेकेटचं 'वेटींग फॉर गोदो' पाहिलं. सुरुवातीची १५ मिनिटं काय चाललंय हेच कळेना. जेव्हा नाटक समजायला सुरुवात झाली तेव्हा ते संपत आलं होतं. खूप विचार केला, मित्राशी चर्चा केली, त्याबद्दल इंटरनेटवर वाचलं आणि मग त्याची थीम थोडी लक्षात आली. आता जितकेवेळा त्याचा विचार मनात येतो तेवढे वेळा नवीनच अर्थ त्यातून उलगडल्यासारखा वाटतो.
दुस-या महायुद्धामध्ये नरसंहार मोठ्या प्रमाणात झाला. त्यात अनेकांचे जवळचे म्हणावेत असे लोक ठार झाले. भणंग लोकांची संख्या वाढली आणि त्यांना जगण्याची काहीच आशा उरली नाही. पण मरणार कसं. मनात विचार आला तरी मरण एवढं सोपं नाही. मग ते काय करतील? ते काय बोलतील? कसं जगतील? त्यांच्यासाठी काय आशावाद असेल? काय आयुष्य असेल? ते विचार काय आणि कसा करतील? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं गोदोमध्ये आहेत. पण ते पुन्हा बघायचंय किंवा वाचायचंय त्याशिवाय माझ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं सापडणार नाहीत.
अफलातून फिलॉसॉफी
आज तो सवयीप्रमाणे गप्पा मारायला आला, विषय होता देव. (त्याच्या आणि माझ्या संवादात फक्त तो बोलत असतो आणि मी एखादा दुसरा शब्दच बोलते.)
तोः हे साले लोक मूर्ख आहेत. त्या सिद्धीविनायकाभोवती भींत बांधलीये देवाचं रक्षण करायला. तरीही लोक त्याच्या पाया पडायला जातात की बाबारे माझं रक्षण कर. कोण कोणाचं रक्षण करणार तेच कळत नाही.
मीः खरं आहे.
तोः आता त्या लालबागच्या राजाला नवसासाठी पहाटेपासून रांगा लागतात. पण तुमच्या घरातला गणपती आणि लालबागचा गणपती वेगळा आहे का? हेच लोकांना कळत नाही.
मीः होय.
मुंबईच्या नावानं चांगभलं!
पाच बिझनेसमन एका रात्री अस्वस्थ होतात आणि मोबाईलवरून मेसेज पाठवून एकमेकांना भेटण्याची तारीख आणि वेळ निश्चित करतात. ते भेटतात तेव्हा त्यांच्यात एकच विषय असतो या शहराची वाट लागली आहे. घरासमोरच्या रस्त्यावर हॉकर्स बसतात, मॉलमध्ये फाल्तूच्या लोकांची संख्या वाढत आहे, पाणी एक तास कमीच येतं, हॉटेल मरिन ड्राइव्हमध्ये डिनरसाठी आजकाल वेटींग असतं.
एवढे गहन प्रश्न निर्माण झाल्याने काय करायचं. सगळ्यात आधी तर याला राजकारणी जबाबदार आहेत. मग वाढत्या झोपड्यांमुळे असं होतंय अशी मोठ्ठी कारणमीमांसा होते. त्यानंतर त्यांच्यातला 'चे गव्हेरा' जागा होतो आणि ठरतं की या अशा नालायक सरकारच्या विरोधात एकत्र यायचं आणि एनजीओ काढायची.
------------------------------------------------------------------------------------------------
एका प्रसिद्ध बापाचा अर्थातच एक प्रसिद्ध मुलगा असतो. तो एके दिवशी गाडीतून निघतो दुस-या ठिकाणी जायला आणि मोठ्याच संकटात सापडतो. गाडीचा रस्ता २०-२५ मिनिटांचाच असतो पण त्याला ट्रॅफिकमुळे तब्बल ४० मिनिटं लागतात. त्याला हे सहनच होत नाही.
मग त्याला या शहरासाठी काहीतरी करायची ऊर्मी येते आणि तो आपल्या मित्रमैत्रिणींना जमवतो. या शहराची कशी वाट लागली आहे आणि ते आपल्यालाच सुधारायचंय अशी वैचारिक चर्चा त्यांच्यामध्ये होते. मग ब्रेनस्टॉर्मिंग चर्चेचं फलित निघतं की एक एनजीओ काढला पाहिजे तरच या शहराचं भलं होईल शेवटी आपण इथेच राहत असल्याने आपलीही काही जबाबदारी आहे की नाही.
मग एनजीओचं उद्घाटन होतं आणि पुढच्या कार्यक्रमाची रुपरेषा पत्रकारांना सांगितली जाते. सगळ्यात पहिला कार्यक्रम मुंबई वनीकरणाचा. झाडं लावा झाडं जगवा. लवकरच या कार्यक्रमाची तारीख घोषित करण्यात येईल आणि आपणही त्यात सहभागी होऊ शकता.
(विशेष सूचनाः वर दिलेल्या दोन्ही घटना काल्पनिक नसून त्यांचा वास्तवाशी पूर्ण संबंध आहे. त्यातील पात्र, प्रसंग आपल्याला प्रत्यक्षात पाहिला मिळाल्यास तो केवळ योगायोग समजू नये ही विनंती.)
Thursday, June 18, 2009
बायकाही बलात्कार करू शकतात!
त्याने घरात कामाला येणा-या बाईवर बलात्कार केला हे अनेकांना सुरुवातीला खरंच वाटतं नव्हतं. पण आता मेडिकल रिपोर्टनी ते सिद्घ केलंय. या सगळ्यामध्ये त्याची बायको अनुपम त्याच्या मदतीला धावून आली यात गैर काहीच नाही. पण तिने त्या कामवाल्या बाईच्या विरोधात केलेलं विधान म्हणजे नव-याला वाचवण्याचा केलेला अत्यंत केविलवाणा प्रयत्न म्हणता येईल. ती म्हणाली 'बायकाही बलात्कार करू शकतात!'
इथे तिचं म्हणणं खरंही मानलं तरी ती बाई स्वतः बलात्कार करणार आणि त्याची तक्रार स्वतःच पोलिसांना करणार की तिच्यावर बलात्कार झाला आहे म्हणून.
आपल्या एखाद्या माणसाने अपराध केला म्हणून स्वतःची सद्सदविवेकबुद्धी बाजूला ठेवून त्याला वाचवू पाहणा-या भारतीय नारी तुला सलाम!
Thursday, May 7, 2009
अंतर
निवडणुकीच्या निमित्ताने एका गावामध्ये गेले होते. माझ्याबरोबर एक पत्रकार मैत्रीण आणि तिचा फोटोग्राफर होता. तिथल्या स्थानिक संघटनेच्या लोकांनी आम्हांला शहरामध्ये फिरवू आणि बाकीची मदत करू म्हणून आश्वासन दिलं. त्यांचा एक कार्यकर्ता आम्हाला घ्यायला एसटी स्टँडवर आला. त्याच्याशी औपचारिक बोलणं झाल्यावर रिक्षा पकडून एका ठिकाणी जायचं निश्चित झालं. फोटोग्राफरला बाइकवरून पुढे पाठवलं. मग रिक्षात तो माणूस आणि आम्ही दोघी. गंमत म्हणजे रिक्षात बसताना त्या कार्यकर्त्याने आमच्या बाजूला बसण्याएवजी चालकाच्या बाजूला बसणं पसंत केलं. जरा विचित्र वाटलं. तो खरंतर त्यांच्या संघटनेच्या मिडीया सेलचा प्रमुख होता. प्रसिद्धीची सगळी जबाबदारी त्याच्यावर होती. पण आमच्याशी बोलताना तो कायम 'अन्कम्फर्ट' वाटत होता.
त्याच गावामध्ये मुक्कामासाठी आम्ही एक रूम आधीच बुक केली होती. फोटोग्राफर आयत्यावेळी आल्याने त्याला कुठे ठेवायचं हा प्रश्न होता. हॉटेलमध्ये एखादी रूम मिळेलच या आशेने तिथे पोहोचलो. पण मिळाली नाही. मग शेवटी त्याला आमच्या दोघींच्याच रूमवर आसरा दिला कारण मुख्य शहर तिथून तीन किलोमीटर होतं आणि दिवसभराच्या प्रवासने तिघेही थकलो होतो. दुस-या दिवशी काही लोक भेटायला आले. ते आम्हाला काही ठिकाणी घेऊन जाणार होते. त्यांनी झोप वगैरे नीट झाली ना विचारलं आणि बोलता बोलता सहज आम्ही 'तिघं' एकाच रूममध्ये मुक्काम केल्याचं त्यांना सांगितलं. त्या पुरुषांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. मग माझी 'रूढ' अर्थाने केलेली चूक माझ्या लक्षात आली.
त्यानंतर मुंबईमध्ये एका राजकीय पक्षाची मोठी सभा झाली. तिथे जाण्यासाठी त्या राजकीय पक्षाच्या काही कार्यकर्त्यांबरोबरच मी निघाले. गाडीमध्ये मागे तीन आणि पुढे दोन अशा जागा होत्या. अर्थात पुढच्या एका जागेवर ड्रायव्हर बसला. मागच्या जागांमध्ये मी आणि एक पत्रकार मित्र. तेवढ्यात त्या पक्षाचा ज्येष्ठ सदस्य किंवा असाच कोणीतरी एक माणूस गाडीपाशी आला. कदाचित ती गाडी त्याच्यासाठी असेल, पण आम्ही त्यात बसलो होतो. तोही आत कोण आहे हे न पाहता आत शिरला. पण मी मधल्या सीटवर बसले होते त्यामुळे लगेच बाहेर गेला आणि काय करायचं हे न सुचल्याने घुटमळत राहिला. मग मी ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्या माणसाला इथेच बसू ना असा प्रश्न विचारला. तर तो हो म्हणाला आणि त्या माणसाला त्याने पुढे बोलावून घेतलं. मग माझ्याबरोबर एक कार्यकर्ता येऊन बसला आणि गाडी सुरू झाली. बराचवेळ गाडीमध्ये शांतता होती. मग त्या कार्यकर्त्याने आमची त्याच्याशी ओळख करून दिली व थोडीफार जुजबी बातचीत झाली. पण अंतर मात्र कायम राहिलं. गाडीतून उतरल्यावर मात्र नजर चुकवणा-या त्याच्या नजरा माझाच वेध घेत असल्याचं मला जाणवलं. पण मग मीही त्या माणसाकडे एक कटाक्ष टाकून गर्दीत मिसळून जाऊन अंतर कायम ठेवणंच पसंत केलं.
तिसरा प्रसंगतर एखाद्या मराठी चित्रपटातल्यासारखा आहे. कृष्णधवल चित्रपटातला प्रसंग आठवा. एखादा मुलगा मुलीला बघायला जातो आणि प्रश्न विचारतो. ती मुलगी पदराशी चाळा करत मान खाली घालून लाजत उत्तर देते.
तस्संच झालं पण जरा उलट ! निवडणुकीला उभा राहणा-या एका उमेदवाराच्या घरी सभेच्या आधी चहापान चाललं होतं. मग बोलताना त्याला त्याच्या मतदारसंघाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. मी त्याला प्रश्न विचारला की तो उत्तर देताना मात्र माझ्या बाजूला बसलेल्या पत्रकाराकडे पाहून उत्तर द्यायचा. माझ्या डोळ्यात डोळे घालून तो पाहतच नव्हता. आधी मला विचित्र वाटलं. पण नंतर गंमत वाटयला लागली. मी त्याला मुद्दाम जास्त प्रश्न विचारायला लागले आणि त्यानेही माझ्याकडे न बघण्याचा 'पण' पूर्ण केला. घरातल्या महिलांसमोर तो ठीक होता. (कदाचित परस्त्री मातेसमान वगैरे संस्कार त्याच्या मनावर झाले असतील. पण मी त्याची माता म्हणजे टू मच!) सभेच्या ठिकाणी पोहोचलो तर महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. मला खूपच आसूरी आनंद मिळाला आता हा कसा भाषण करणार? त्याने भाषण केलं. पण महिलांचा विशेष उल्लेख न करता किंवा त्यांच्या थेट डोळ्यात न पाहता!
या सगळ्यांमध्ये आणखी एक प्रसंग नमूद करण्यासारखा आहे. मुक्कामाला एका हॉटेलमध्ये उतरले होते. तिथे टॉयलेटमध्ये कच-याचा डबा होता. त्याच्याबाजूला सॅनिटरी पॅड टाकून देण्यासाठी एक लहान कागदी पिशवी ठेवली होती. मी तिचा वापर केला. नंतर बाहेरून आल्यावर अर्थातच रूम साफ करून ठेवली होती आणि त्या डब्याजवळ आणखी दोन तशाच कागदी पिशव्या ठेवल्या होत्या. मला खूपच आश्चर्य वाटलं. ती रूम साफ करणारा एक मुलगा होता. त्याची जाणीव पाहून मी थक्क झाले. याने थोडं अंतर कमी करण्याच्या केलेल्या प्रयत्नाने समाधानीही!
Thursday, February 19, 2009
हॅपिली हेअर आफ्टर!
आपल्याकडे सौंदर्याविषयीचे समज इतके पक्के आहेत की शारीरिक सौंदर्याच्या पलीकडेही काही असू शकतं हे आपण मान्य करत नाही किंवा समजून घेत नाही. उदाहरणच घ्या स्त्रियांचं सौंदर्य केसांवर ठरतं. ते किती लांब, जाड, काळे वगैरे आहेत. पण एखाद्या बाईला जर केसच नसतील तर? तेसुद्धा हॉलीवूडच्या एका सौंदर्यवतीला?
हो! २००२च्या बाँडपटातून 'डाय अनादर डे'मधून अनेकांना घायाळ करणारी हेल बेरी तिच्या आगामी चित्रपटात 'नॅपिल्ली एव्हर आफ्टर'मध्ये चक्क टक्कल करणार आहे.
हा चित्रपट हलकाफुलका, विनोदी असला तरी त्याची कथा ही मात्र एक समस्या समोर आणणारी आहे. सतत गळणा-या केसांना वैतागून हेल बेरी संपूर्ण केस काढून टाकते. पण त्यामुळे तिला किती सामाजिक समस्यांना तोंड द्यावं लागतं ते चित्रपटातच पाहायला मिळेल.
हेल स्वत: या चित्रपटातील लुकबाबत मनाशी ठाम नाही. सगळे केस काढून टाकणं आणि लोकांसमोर उभं राहणं तिच्यासाठी कठीण असल्याचं ती सांगते. पण या चित्रपटातील कथा तिला आणि केसांच्या सौंदर्याबाबत कायम काळजीत असणा-या सगळ्या महिलांना एक शिकवण देईल, अशी आशाही तिला वाटते. कदाचित हा चित्रपट पाहून मलाही केस गळल्यावर खूप वाईट वाटणार नाही.
पण कल्पना करा की खरोखरंच तिचा लुक प्रेक्षकांना अपील झाला तर...
...तर काय सगळ्या तरुणी तसा हेअर(पूर्ण)कट करण्यासाठी ब्युटी पार्लरच्याबाहेर रांगा लावतील. कदाचित त्यांना काही तास, दिवसही रांगेत थांबावं लागेल कारण संपूर्ण केस कापण्यासाठी जरा वेळच लागेल ना!
मग या हेअरकटचे दर खूप वाढतील. हा हेअरकट करणारे वेगळे एक्सपर्ट असतील. त्यांच्या खास मुलाखती प्रत्येक न्यूजचॅनेलवर पाहायला मिळतील.
त्याचवेळी दुसरीकडे शॅम्पू, कंडिशनर, केसांचं तेल या कंपन्यांचे मात्र धाबे दणाणतील. त्यांचे सेल कड्यावरून ढकलून दिल्याप्रमाणे एकदम घसरतील. गळणा-या केसांवर हमखास उपचार करणारे अनेक डर्मिटॉलॉजिस्ट आणि ट्रायकॉलॉजिस्टही अडचणीत येतील. मग या कंपन्या आणि तज्ज्ञ काहीही करून या चित्रपटाचं प्रेक्षपण थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय लेव्हलवर हरएक प्रयत्न करतील.
हेल बेरीला जगभरामध्ये केवळ याच विषयावर बोलण्यासाठी आमंत्रणांची रीघ लागेल. मग तिच्या आयुष्याला या कंपन्यांपासून धोका निर्माण होईल. तिला किडनॅप करण्याचे प्लॅन आखले जातील.
पण यातून आणखी काही समस्या निर्माण होतील, जसं कापलेल्या केसांचं करायचं काय? महापालिका हे केस डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यापासून अटकाव करणारा नियम काढेल. या केसांपासून विग बनवले तरी ते घेणार कोण असा प्रश्न असल्याने तोही उपयोग होणार नाही. मग वेस्टमधून बेस्ट निर्मिती करणा-या काही घरगुती महिला सखी-दुखी सारख्या दुपारी लागणा-या कार्यक्रमात या केसांच्या पिशव्या, शोपीस, फ्लॉवरपॉट, पेंटींग असं काहीतरी कलाकृती करतील. पण तरीही त्यांची संख्या संपणारी नसेल.
अंडरवर्ल्डवालेही या संधीचा फायदा घेतील. महागडी आधुनिक शस्त्र स्मगल करण्यापेक्षा केसाने गळा कापणं सोपं असल्याने ते केसांचे पुंजके जमा करून घोड्याएवजी तेच कमरेला लावून फिरतील.
हे सगळं होत असतानाच एक दिवस अचानक सगळ्या वर्तमानपत्रात जाहिरात येईल. त्यात हेल बेरीला पहिल्यासारखी केसांसकट दाखवली जाईल आणि तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा त्यात असेल 'हॅपिली हेअर आफ्टर!'
Wednesday, February 11, 2009
संस्कृती विरुद्ध चड्डी आणि कोंडोम!
भारतातील श्रीराम सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मंगलोरमधल्या पबवर हल्ला केला आणि मुलींना मारहाण केली. त्याचं प्रतिउत्तर मुलींनीच एवढ्या समर्थपणे दिलं की मी तर श्रीराम सेनेला पाठवलेल्या पिंक चड्ड्या आणि कोंडोमची बातमी वाचून खूष झाले.
त्या प्रसंगानंतर मी लगेच एक लेख लिहिला होता आणि मैत्रिणीच्या सांगण्यावरून एका मासिकाला पाठवून दिला. त्यांच्याकडून काही रिप्लाय आलेला नाही. पण त्यांनी छापला किंवा नाही छापला तरी या ब्लॉगवर मात्र जरूर टाकीन. तो लेख छापून यायची थोडी आशा असल्याने थांबले आहे.
आता व्हॅलेंटाईन डेसुद्ध जवळ आला आहे. त्यामुळे या संस्कृती रक्षकांचे असले उपद्रव आणखी वाढतील यात शंका नाही. पण मुलींनी त्यांना जे अभिनव पद्धतीने उत्तर दिलंय त्यामुळे सगळेच जरी बुचकळ्यात पडले आहेत.
Monday, February 9, 2009
एक डाव मंदीचा!
माझ्या एका मित्राचा काल फोन आला. खूप घाबरलेला आणि टेन्शनमध्ये होता. त्याच्या कार्यालयातल्या काही लोकांना मंदीचं कारण देऊन सरळ घरी बसवलं होतं. त्याने त्यात आपलं नाव नाही याची खात्री केली पण भीती पूर्णतः त्याच्या मनातून गेलेली नाही. सगळ्या गोष्टी सुरळीत होईपर्यंत प्रत्येक नोकरदार माणूस याच भीतीच्या सावटाखाली राहील असं वाटतंय.
अमेरिकेमधून सुरू झालेल्या या मंदीचं सावट आता सगळ्या जगभर पसरतंय. काही लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्यात आणि आणखी काहींच्या जातील अशी सतत वल्गना वृत्तपत्रातून होत आहे. पण हे सर्व होत असूनही माझ्या मनात वारंवार एक प्रश्न उभा राहतो की खरोखरंच मंदीच्या छायेत आपण वावरत आहोत की तसं भास निर्माण केला जात आहे.
मुंबईसारख्या ठिकाणी श्रीमंत किंवा नव-श्रीमंतांच्या फेव्हरेट जागा उदाहरणार्थ मॉल्स, फाईव्ह स्टार हॉटेल्स, महागडे पब्ज इथे मंदीचा जरासाही परिणाम झालेला दिसत नाही. तिथे कोट्यावधीच्या उलाढाली अगदी सुरळीतपणे सुरू आहेत. मागच्याच आठवड्यात झालेल्या आयपीएलमध्ये प्रत्येक क्रिकेटपटूवर कोट्यावधी रुपयांच्या बोली लावण्यात आल्या. त्यातही विजय मल्ल्याने मंदीचं कारण पुढे करत त्याच्या किंगफिशर कंपनीच्या अनेक कामगारांची पगारकपात केली होती. अनेकांना घरीही बसवलं होतं. मग एवढे कोट्यावधी पैसे त्याच्याकडे आले कुठून?
अनेकांचे पगार कमी होताना, नोकऱ्या जाताना आपणं पाहिलंय, पण बॉलिवूमध्ये शाहरूखने काही कोटी कमी घेतले, अक्षयला फिल्म डायरेक्टरने कमी पैसे दिले.... अशा बातम्या काही एकायला मिळाल्या नाहीत. फटका बसलाय तो नोकरदार वर्गातल्या सगळ्यात खालच्या फळीला.
त्यामुळे ही मंदी म्हणजे भांडवलदारी समाजाने गरज संपलेल्या लोकांना बाजूला काढण्यासाठी केलेली एक योजना आहे की काय, असा सहज प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. गरजेच्या वेळी त्यांच्याकडून राबवून घेतलं आणि आता त्यांना ठेंगा दाखवला.
दुसरा आणखी एक विचार आला. काही क्षेत्रातल्या लोकांना अवास्तव पगार देण्यात आले. त्यातूनच नव-श्रीमंत वर्ग उदयाला आला. त्यांना राहणीमानाचे विशिष्ट नॉर्म घालून दिले.... राहायला किमान दोन-तीन हजार चौरस फुटाचा फ्लॅट टॉवरमध्ये, चकचकीत इंटीरीअर, दोन गाड्या, नोकर-चाकर, खाणं-पिणं फक्त पॅकेज फूड, शॉपिंग फक्त मॉलमध्ये, वीकएंड एखाद्या फार्महाऊसवर आणि लाँग व्हेकेशन केसरीबरोबर युरोपमध्ये. भांडवलदारांचे मॉल्स चालण्यासाठी या गुळगुळीत जीवनाची इतकी सवय लावली की आजूबाजूची प्रत्येक गोष्टच त्यांना झोपडपट्टी वाटायला लागली.
त्यामुळे कंपनीने म्हणजे अर्थातच भांडवलदारांनी त्यांना भरमसाठ पगार दिला तरी त्यांना ज्या आयुष्याची सवय लावली त्यानुसार हा सगळा पगार पुन्हा शॉपिंगच्या माध्यमातून या भांडवलदारांच्याच खात्यात पडत होता. मग शासनही यामध्ये मागे कसं राहणार. मेट्रो रेल्वेपासून मॉनोरेलपर्यंत सगळ्या इन्फ्रास्टक्चरच्या प्रोजेक्टची त्यांनी उद्घाटनं केली आणि न्यूयॉर्कनंतर मुंबईच असा आभास निर्माण केला.
पण मग मंदी आली आणि अनेकांचे डोळे पांढरे झाले. काही हजार किंवा लाख रुपये पगाराची नोकरीच गेली. आता काय?
हा भांडवलदारांनी एकूणच मंदीचा डाव टाकून खेळ चांगलाच रंगात आणलाय. त्यामध्ये त्यांचा विजय होतो का, आणखी किती काळ हा खेळ सुरू राहणार, कदाचित त्यांनी कंटाळा येईपर्यंत किंवा ते हरेपर्यंत. पण माझं त्यात काय होणार ही चिंता मलाही भेडसावते आहे कारण मीही शेवटी नोकरदारच ठरते.
Friday, January 23, 2009
सामाजिकदृष्टीचा अभाव
या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे चार वर्षांपूर्वी गावातील लोकांनी कर्जाला कंटाळून ...गाव विकायला काढलं होतं. त्याची बातमी वृत्तपत्रात छापून आली आणि सगळ्यांचं लक्ष वेधलं ते या गावातल्या लोकांच्या गरिबीकडे आणि शेतीविषयक समस्यांकडे.
गावाला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक नेते, राजकारणी, समाजकारणी इथे येऊन गेले. त्यामध्ये राहूल गांधींचाही समावेश होता. गावाकडे येणारे नेते काहीतरी घोषणा करून जात त्यामुळे आता गावचं नशीब बदलणार असंच स्वप्नं गावकऱ्यांना पडून राहीलं.
पण काही स्वप्नं कधीच पूर्ण होत नसतात, त्यातलंच हे एक ठरलं. आज या घटनेला चार वर्ष उलटून गेली तरी गावची लोक मात्र होती तिथेच आहेत आणि त्याच परिस्थितीमध्ये.
आता तर त्यांनी काही चांगलं घडेल अशी आशाही सोडली आहे. त्यांचं गावं हे एक तमाशा बनून राहिल्याची भावना त्यांच्या मनामध्ये तयार झाली आहे. गावाला भेट द्यायला येणारा 'व्हीआयपी' कायम तीच गाव विकायला काढल्याची घटना आठवतो आणि काहीतरी पोकळ घोषणा करून चालता होता. लोकांनाही त्याचा मनापासून कंटाळा आला आहे.
काही शेतकऱ्यांशी केंद्राने आणि राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफी पॅकेजबद्दल चर्चा झाली. काही जणांना याचा लाभ झाला तर अनेकांना झाला नही.
एवढं मात्र खरं की प्रश्न केवळ कर्जमाफीचा नाही. शेतकऱ्याला जगताना अनेक समस्या येतात. शेती हे त्याचं रोजगाराचं साधन आहे. पण त्याव्यतिरिक्त त्याला कुटुंब आहे, सामाजिक प्रतिष्ठा आहे, काही समस्या आहेत आणि काही स्वप्नंही आहेत. पण शेतकरी आत्महत्येचा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा फक्त पैशाच्या रुपाने पॅकेज जाहीर करून सरकार मोकळं होतं. त्याच्या सामाजिक परिस्थितीमध्ये त्यातून काहीच फरक पडत नाही. पैसाही एकदा देऊन संपून जातो. तो सतत येत राहावा यासाठी उपाय हवा.
सतत बदलणारं ऋतूमानही कायम शेतीच्या समस्यांमध्ये भर टाकत असतं. अशा सर्वांगाने कधीच शेतकऱ्यांच्या समस्यांचा विचार होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफ झालं पण यावर्षी अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि नवीन पीकच आलं नाही. त्यामुळे पुन्हा कर्ज घेतलं. कर्जाचं चक्र हे न थांबणारं आहे.
इथल्या कुटुंबातल्या बायकांशी बोलताना तर मला वारंवार सतावणारा प्रश्न आणखी तीव्र झाला. काही कुटुंब शेतमजुरी करून पोट भरतात. पण शेतीचं कामच यावेळी नसल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. आठवड्याला जेमतेम १०० रुपयांवर चार-पाच जणांच्या कुटुंबाचा संसार चालतो. मला अनेकदा हा प्रश्न सतावतो की एखाद्या दिवशी त्यांना कमाईच मिळाली नाही तर ते काय करत असतील. संसार फरफटत नेल्यासारखं आयुष्य त्या बायका जगतात. त्यातही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हिंमत सोडलेली नाही. पुरुष शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येची आकडेवारी मोठी आहे पण त्यात क्वचितच एखाद्या महिलेचा समावेश आढळतो. उलट ती कायम येईल त्या परिस्थितीत घर सांभाळत राहते. जगत राहते आणि जगवत राहते.
वारंवार जाहीर होणाऱ्या पॅकेजमुळे आणखी एक थोडासा विचार मनात चमकून गेला. पॅकेजचं आमीष दाखवून तुमच्या सर्व समस्यांवर तो एकच उपाय आहे असा आभास तर काही स्वार्थी लोक करत नसतील ना. कारण ही पॅकेज खूपच कमी प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, मध्येच गायब होण्याचं प्रमाणा मात्र खूप जास्त आहे.
शेवटी असं म्हणता येईल की कोट्यावधी रुपयांच्या पॅकेजनी सुटणारा हा प्रश्न नाही. त्याची मूळं खूप खोलवर आहेत आणि त्यांना विविध शाखाही आहेत. सामाजिक दृष्टीनेच हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो.
Monday, January 19, 2009
नक्षलवाद्यांच्या प्रांतात!
खरंतर या अनुभवाबद्दल खूप आधीच लिहायला हवं होतं. पण कंटाळा केला. एका मित्राने काही फोटो पाठवल्याने पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या आणि नकळत त्याबद्दल लिहायला घेतलं.
नागपूरच्या ट्रीपमध्ये सगळ्यात एक्सायटींग अनुभव हा गडचिरोलीला जाण्याचा होता. हा भाग नक्षलवाद्यांसाठी प्रसिद्ध असल्याने तिथे कधीच न गेलेल्या माणसांची एकच कल्पना असते की नक्षलवादी हे कोणीतरी धोकादायक आणि खतरनाक लोक आहेत.
मी जेव्हा इतर पत्रकार मित्रांसोबत तिथे जायचं ठरवलं तेव्हा माझ्या काही हितचिंतकांनी बऱ्याच शंका उपस्थित केल्या. एकतर २४ डिसेंबरच्या रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास आम्ही सहा जण निघालो आणि नागपूरपासूनचा रस्ता साधारण ३५० किलोमीटरचा होता.
त्यामुळे आम्ही सुखरूप कसे पोहोचणार, बरोबर माहितगार कोण आहे इथपासून ते अगदी प्रोटेक्शन घेतलंय का इथपर्यंत प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे माझ्या मनातही उगाचच शंका निर्माण झाल्या. त्या भागाची फारशी माहिती नसताना आपण उगाच धाडस वगैर करत नाही ना, असं काही क्षणांसाठी वाटून गेलं.
पण मग माझ्या खास मित्राने लक्षात आणून दिलं की नक्षलवादी हे दहशतवादी नाहीत की जे सामान्य लोकांवर हल्ले करतील. त्याचं म्हणणं अगदी बरोबर होतं आणि प्रवास संपताना तर या सगळ्या गोष्टींबद्दल खूप हसायला आलं.
नागपूरहून उमरेडकडे गेल्यावर आमच्या गाडीने स्पीड घेतला. जशजशी गावं मागे पडू लागली तशी जंगल गर्द होत गेल्याची जाणीव झाली. मिट्ट काळोख त्यातून आमची टाटा सुमो, ना समोरून गाडी ना मागून गाडी. कितीतरी वेळ असाच एकाकी प्रवास सुरू होता. गाडीचे लाईट जेवढ्या लांब जातील तेवढंच काय ते दिसायचं मागं वळून पाहिलं की पुन्हा अंधाराचं साम्राज्य.
अगदीच नाही म्हणालया दोन-चार रान मांजरी काय त्या दिसल्या. पण इतर प्राणी किंवा पक्ष्यांनी काही दर्शन दिलं नाही. गप्पा मारत, अर्धवट झोपत प्रवास चालला होता. फक्त भीती सुरूंगांची वाटत होती. नक्षलवादी आजकाल पोलिसांसाठी रस्त्यावर सुरूंग पेरून ठेवत असल्याने पुढे बसलेले दोघेजण प्रामाणिकपणे रस्त्यावर नजर ठेवून होते.
मग नक्षलवाद्यांच्या प्रांतात आम्ही प्रवेश केला. त्या भागात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात अनेक चकमकी झाल्या होत्या. इतरांकडून त्याबद्दलच्या गोष्टी एकता एकता पहाटे तीन-साडेतीनला आलापल्ली या गावी पोहोचलो. रात्रीच्या अंधारात गावाबद्दल काही कल्पना येणं शक्यच नव्हतं. पण एवढ्या थंडीच्या रात्रीही आमची एकजण फार आतुरतेने वाट पाहत होता तो म्हणजे महेश तिवारी.
महेश ई टीव्हीचा पत्रकार असून तो मूळचा सिरोंचाचा आहे. त्याच्याच आग्रहाखातर आम्ही तिकडे गेलो आणि निघेपर्यंतचा प्रत्येक क्षण त्याच्या पाहुणचाराचा आस्वाद घेत होतो.
थोडी विश्रांती घेऊन पुन्हा सकाळी आठ वाजता आमचा प्रवास सिरोंचाच्या दिशेने सुरू झाला. सिरोंचा हे गावं महाराष्ट्राच्या सीमेवर येतं, मध्य प्राणहिता नदी आणि मग आंध्रप्रदेश सुरू होतो. सिरोंचाचं दुसरं महत्त्व म्हणजे आंध्रप्रदेशातून नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रात याच मार्गे प्रवेश केला असं म्हटलं जातं.
रस्त्यात एका पोलीस स्टेशनला भेट दिली. ते पोलीस स्टेशन नुकतंच बांधलं होतं त्यामुळे कॉन्स्टेबलना रहायला एक तात्पुरता उभारलेला तंबू होता. तिथे पोलिसांशी खूप वेळ गप्पा आणि चहापान झालं. त्यांच्या बोलण्यातून प्रकर्षाने दोन गोष्टी पुढे आल्या. एकतर नक्षलवादी दिसला की मारायचा हे त्यांच्या मनात भिनलं होतं. दुसरं म्हणजे तो भाग खूपच दुर्लक्षिला गेल्याने लोकांनी न घाबरता या भागाला भेट द्यावी अशी विनंती ते वारंवार करत होते.
तिथून पुढे जाताना जंगल सागाच्या झाडांनी आणि तेंदूने भरलं होतं. पण सागाची बेसमुरास तोडही झाली होती. मोठ्या प्रमाणात कापूस आणि मिरच्यांची शेतीही लागली. भात म्हणजेच तिथे प्रसिद्ध असलेलं धान त्याची गोदामंही पाहिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली ही नैसर्गिक संपत्ती पाहून मी खूप भारावून गेले. एक विचार सहज मनामध्ये चमकून गेला की नक्षलवादी नसते तर कदाचित हे सगळं जंगलंच आपल्यासारख्या शहरी भामट्यांनी एव्हाना लुटून नेलं असतं. नक्षवाद्यांच्या भीतीमुळे याकडे कोणाचं फारसं लक्ष गेलेलं नसावं.
मग सिरोंच्याला पोहोचल्यावर महेशच्या घरी गेलो आणि पाहुणचार घेतला. तिथून नदीमार्गे आंध्रप्रदेशात गेलो. महेशशी आणि इतर स्थानिक लोकांशी गप्पा मारताना लक्षात आलं की इथल्या लोकांना महाराष्ट्रापेक्षा आंध्रप्रदेश जास्त जवळचा आहे. एकतर अंतर कमी आहे. महाराष्ट्रापेक्षा स्वस्ताई आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीमाल विकण्यासाठी, बाजार म्हणून आंध्रला पसंती देतात. फोनसारख्या सुविधाही आंध्रनेच या भागांमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.
प्राणहिता नदीमधून फेरफटका मारणं खूपच चांगला अनुभव होता. निळंपाणी एका बाजूला शेती तर दुसऱ्या काठावर माळरान. या नदीच्या पाण्यावर महाराष्ट्रातला शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पण आंध्रप्रदेश सरकार मात्र यावर धरण बांधण्याच्या विचारात असल्याने पुढच्या काही वर्षात महाराष्ट्राला पाणी मिळणार नाही, अशी भीती व्यक्त केली जाते.
मग संध्याकाळी एका ब्रिटिशकालीन गेस्टहाऊसच्या गच्चीवर गेलो. सिरोंचामधील ही उंच इमारत. तिथून प्राणहिता नदीच्या कुशीमध्ये वसलेलं हे लहानसं गावं एवढं छान दिसत होतं की निघावसंच वाटत नव्हतं. पण खरं दृश्य तरी आम्ही पाहायचं बाकी होतं.
तिथून साधारण ४० किलोमीटरवर असलेल्या सोमनूरच्या दिशेने आम्ही निघालो. बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असल्याने धीम्या गतीने गाडी चालली होती. पण जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा डोळे विस्फारले गेले. महाराष्ट्राच्या सीमेवर आम्ही उभे होतो. समोर उजव्या हाताला आंध्रप्रदेश तर त्याच्याचवर छत्तीसगडची सीमा आणि मधून वाहणारी स्फटीकासारखी शुभ्र नदी. तिनही राज्यांचे त्रिकोण एकत्र आले होते. नदीच्या जवळचा माळ सोडला तर कीर्र आणि हिरवंगार जंगल. त्यातच आंध्रच्या भूमीवर मावळणारा सूर्य आणि त्याच्या प्रतिबिंबाने पाण्यावर टाकलेला झोत. माणसांचा काहीच मागमूस नाही फक्त निसर्गाची रूपं मन मोहावून टाकत होती. पण दिवस मावळल्याने तिथून निघणं भाग होतं. पुन्हा या भागामध्ये नक्षलवादी संध्याकाळी गावामध्ये येतात आणि याच भागातून इतर राज्यांमध्ये जातात, अशीही एक कथा एकायला मिळाली. शेवटी परतीचा प्रवास सुरू झाला.
परतीच्या प्रवासात या भागाबद्दल असलेल्या अनेक चुकीच्या कल्पना गळून गेल्या होत्या. उलट नवीन अनुभवाने मनाला उभारी दिली होती.
गडचिरोली म्हटलं की नक्षलवाद असा ठपका ठेवून आपण मोकळे होतो. पण हे करत असताना नक्षलवाद म्हणजे काय आणि तो का सुरू झाला याची माहितीही अनेकदा नसते. पण या नक्षलवादाच्या पलीकडेही इथे सर्वसामान्य लोक राहतात आणि ती सर्वसामान्य आयुष्य जगतात याकडे जरा पहायला हवं. हा भाग खरोखरच दुर्लक्षित आहे. नक्षलवाद्यांना मारण्यासाठी किंवा त्याचा बीमोड करण्यासाठी सरकार जो निधी देतं त्याचा काही भाग जरी स्थानिक लोकांना दिला तर त्यांच्या काही प्राथमिक गरजा भागू शकतील. स्थानिकांना मग नक्षलवादाची मदत घ्यायची गरज पडणार नाही.
पण कोणत्याही समाजाचा इतिहास पाहिला तर असं दिसतं की, जेव्हा अन्यायाचा अतिरेक होतो तेव्हा नक्षलवादासारख्या प्रवृत्ती जन्माला येतातच. पण त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होण्याएवजी त्यांना मारून टाकण्याकडे समाजाचा कल दिसतो. त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्राचा आपल्याच या वेगळ्या पाडलेल्या भागाशी संवाद वाढला तर काही आशा निर्माण होतील.
Tuesday, January 6, 2009
फुगा
काम संपल्यावर संध्याकाळी एका मित्रासोबत भेळेच्या शोधात मी नागपूरच्या बर्डी भागामध्ये आले. कोणीतरी सांगितलं होतं की इथे मटका भेळ प्रसिद्ध आहे. ती शोधण्यासाठी बरीच पायपीट केली. पण काही मिळाली नाही. शेवटी नागपूरच्या एका मित्राला फोन केला तर त्याने वेडात काढलं, अशी काही भेळ इथे मिळतच नाही असं सांगून.
मग समोर दिसणाऱ्या भेळच्या दुकानाकडे आम्ही वळलो. तिथे एक लहान मुलगा भीक मागत होता. मळके-कळकट कपडे, हाता-पायावर आणि चेहऱ्यावरही धुळीचे थर साचले होते. पण डोळे मात्र खूप बोलके आणि त्याच्याशी संवाद साधल्यावर तो मुलगा खूपच स्मार्ट असल्याचं जाणवलं.
त्याच्या हातात एक थाळी आणि त्यात साईबाबाचा फोटो होता. भीक मागत तो जवळ आला असता माझ्या मित्राने त्याची चौकशी केली. तो का भीक मागतोय, कुठून आलाय, आई-वडील, राहतो कुठे वगैरे.
त्याने सांगितलेली माहिती खरी की खोटी माहित नाही. पण त्याचे आई-वडील मेले होते. तो अमरावतीचा राहणारा होता आणि इथे कोणातरी एका माणसाने त्याला या धंद्याला लावले होते.
त्याला भीक द्यायला आम्ही नकार दिला पण काही खाणार का विचारलं. तर तो म्हणाला की फक्त चिकन खातो. त्याला भेळ किंवा चाट विचारलं तर तो नको म्हणाला. पण त्याला तोपर्यंत कदाचित जाणीव झाली असेल की माझा मित्र खरोखरच आपुलकीपोटी विचारतो आहे.
त्यानंतर त्याने केलेली मागणी एकून मी थक्क झाले. त्याने फुगा मागितला. खाण्यापिण्यापेक्षा काही वेळ हवेत तरंगणारा, रबराचा रंगीत गोळा त्याला हवा होता. मित्राने तो घेऊन दिला तेव्हा त्या मुलाला खूप आनंद झाला. त्याचे डोळेच ते सांगत होते.
वाईट याचं वाटतं की त्या मुलाला फुग्यासारखी क्षुल्लक गोष्टही मिळू नये. त्यानंतर मी आणि मित्र बराचवेळ या विषयावर बोलत होतो. आपल्या देशामध्ये लहान मुलांचं लहानपण किती चिरडलं जातयं याची जाणीव खरं तर मला मित्राने करून दिली. त्याला या रस्त्यावरच्या अनाथ मुलांसाठी काही काम करण्याची इच्छा आहे. त्याची सेन्सिटिव्हिटी पाहून मला नक्कीच विश्वास आहे की तो हे करू शकतो.